परप्रांतीय मजुरांचा प्रवास खर्च प्रदेश काँग्रेस करणार : मोहन जोशी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 12:33 AM2020-05-05T00:33:03+5:302020-05-05T00:34:59+5:30
केंद्र सरकारने व रेल्वे मंत्रालयाने मजुरांची जबाबदारी नाकारली.
पुणे: विमानातून पुष्पवृष्टी करण्यावर खर्च करण्याऐवजी कंगाल झालेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वे सेवा विनामूल्य उपलब्ध करून द्यायला हवी होती अशी टीका करत हा खर्च काँग्रेस पक्ष करेल असे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी सांगितले.पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देशाच्या सर्व राज्यातील काँग्रेस शाखांंना तसे आदेश दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेवरून राज्यात त्यासाठी व्यवस्था सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. जोशी म्हणाले,जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांना यासंदर्भात काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
केंद्र सरकारने केवळ चार तासांची मुदत देऊन लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे लाखो मजूर आपापल्या गावी जावू शकले नाहीत. त्यातील काहीजण पायपीट करत गेले. सन १९४७ च्या फाळणीनंतर प्रथमच असे विदारक चित्र देशात पाहायला मिळाले. आजही लाखो मजूर देशाच्या अनेक भागांमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना आपापल्या गांवी जायचे आहे. पण, जाण्यासाठी काही व्यवस्था नाही. त्यांच्याजवळ पैसेही नाहीत. हे मजूर संकटात असताना भारत सरकार व रेल्वे मंत्रालय या मजुरांकडून गाडी भाड्यासाठी पैसे घेत आहे हे दुर्देव आहे. परदेशात अडकलेल्यांना आपण आपले कर्तव्य म्हणून विशेष विमान पाठवून त्यांना मायदेशी आणण्याची मोफत सोय केली. गुजरातमधील एका कार्यक्रमाच्या भोजन आणि प्रवासासाठी शंभर कोटी रुपये खर्च केले. रेल्वे मंत्रालयाने प्रधानमंत्री कोरोना फंडात एकशे एक्कावन्न कोटी देणगी दिली तर देशाच्या विकासात ज्यांचे योगदान आहे त्या गरीब मजुरांना केंद्र सरकार मोफत रेल्वेची सुविधा का देऊ शकत नाही? या मजुरांच्या मोफत रेल्वे प्रवासासाठी काँग्रेस पक्षाने वारंवार मागणी केली. परंतु, ना सरकारने, ना रेल्वे मंत्रालयाने त्याकडे लक्ष दिले. म्हणून सोनिया गांधी यांनी ठाम भूमिका घेऊन निर्णय घेतला की, या मजुरांना त्यांच्या गांवी मोफत पाठविण्यासाठी त्या-त्या राज्यांमधील प्रदेश काँग्रेस त्या मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च करेल.
याकरिता पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे रेल्वे विभागाचे व्यवस्थापक यांना निवेदने दिली. पुणे आणि परिसरातून जावू इच्छिणारे मजूर, रेल्वे प्रशासनाचा त्यांच्यासाठी होणारा खर्च याचा तपशील मागवला आहे. तो तत्काळ मिळावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असल्याची माहिती जोशी यांनी दिली.
रेल्वेने जाऊ इच्छिणाऱ्या मजुरांची तपासणी बी.जे मेडिकल ग्राऊंड अथवा तत्सम ग्राऊंडवर करण्यात यावी असे जिल्हाधिकाऱ्यांना सुचविण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय स्वरुपाचे सहकार्य करण्याची तयारीही काँग्रेस पक्षाने दाखवली आहे जोशी यांनी सांगितले