स्पेशल, फेस्टिव्हल स्पेशल गाड्यांमुळे प्रवाशांना भुर्दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रेल्वे प्रशासनाने पुण्यासह देशातील विविध प्रमुख स्थानकांवरून स्पेशल व फेस्टिव्हल दर्जाच्या विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. हे करीत असताना प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती रद्द केल्या. तसेच ह्या गाड्यांचा तिकीट दारात देखील मोठी वाढ केली. जनरल तिकिटांची विक्री बंद केली. मात्र, जनरल डब्यातला प्रवास मात्र सुरूच ठेवला. विशेष म्हणजे प्रवाशांना जनरल डब्यातून प्रवास करायचे असेल तर त्यांना आरक्षित तिकीट काढावे लागते आहे. आरक्षणामुळे तिकिटाच्या दरात विनाकारण वाढ झाली. याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. प्रवास जनरलचा तिकीट मात्र आरक्षित डब्यांचे अशी परिस्थिती निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर रेल्वे प्रशासनाने प्रवासी गाड्या सुरू करताना पॅसेंजर गाड्या व जनरल तिकीट विक्री बंद केली. उर्वरित गाड्यांना स्पेशलचा दर्जा दिला. पुणे ते दौंड दरम्यान ७८ किमीचे अंतर आहे. पूर्वी या दरम्यान जनरलचे तिकीट दर वीस रुपये होते. आता आरक्षण अनिवार्य आहे. त्यामुळे फेस्टिव्हल गाड्यांचे सेकंड सीटिंगचे दर ९० रुपये झाले, तर सामान्य शयनयानचे दर ४१५ इतके झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
बॉक्स १
पुणे स्थानकावरून धावणाऱ्या स्पेशल, फेस्टिव्हल स्पेशल एक्सप्रेस
पुणे-मुंबई डेक्कन, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, पुणे-दानापूर एक्सप्रेस, पुणे-जम्मूतावी झेलम एक्सप्रेस, पुणे-दानापूर एक्सप्रेस.
पुणे-वाराणसी ज्ञानगंगा एक्स्प्रेस, पुणे-जबलपूर एक्स्प्रेस, पुणे-जयपूर एक्स्प्रेस, पुणे-लखनऊ एक्स्प्रेस, पुणे-सतरंगाची, पुणे-नांदेड एक्स्प्रेस, राजकोट-सिकंदराबाद एक्स्प्रेस, यशवंतपूर-जयपूर, बंगळुरू -अजमेर, जोधपूर-बेंगळुरू, गांधीधाम-बेंगळुरू, अजमेर-म्हेसूर, मुंबई-नागरकोईल, आदी गाड्या धावत आहेत .
बॉक्स २
पुणे ते दौंड दरम्यान धावणारी वाराणसी, नांदेड आदी फेस्टिव्हल एक्स्प्रेसला सेकंड सीटिंग - ९० रुपये , शयनयान ४१५ रुपये, थ्री एसी ११०० रुपये असे तिकीट दर आहे. तर दुसरीकडे विशेष रेल्वेला तुलनेने कमी तिकीट दर आहे. याच सेक्शनमधून धावणारी उद्यान एक्स्प्रेसला सेकंड सीटिंग - ५५ रुपये, शयनयान १४५ रुपये असे तिकीट दर आहे. तर पुणे ते दौंड जनरल तिकीट केवळ वीस रुपये होते. मात्र जनरल तिकीट विक्री बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
कोट : 1
प्रवासातील एक मोठा वर्ग जनरल डब्यांतून प्रवास करतो. मात्र त्यांना जास्तीचे पैसे देऊन तिकीट काढावे लागते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता विशेष दर्जाच्या रेल्वे बंद करून पूर्वीसारख्या सामान्य दर्जाचे रेल्वे सुरू करायला हव्यात. यातून रेल्वेचा जरी फायदा होत असला तरीही सामान्य प्रवासी मात्र विनाकारण भरडला जात आहे. रेल्वेने आता फायद्याचा विचार न करता प्रवाशाचा विचार करावा. स्पेशल व फेस्टिव्हल एक्स्प्रेसचे तिकीट दर सामान्यांना परवडण्यासारखे नाही.
हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप, पुणे
कोट ; 2
जनरल डब्यातील गर्दीवर नियंत्रण रहावे म्हणून जनरल डब्यांत आरक्षित तिकीट प्रणाली सुरू करण्यात आली. सध्या सुरू असलेल्या रेल्वे ह्या कोविड स्पेशल आहेत. पूर्वीप्रमाणे सामान्य रेल्वे चालविण्याबाबत रेल्वे बोर्ड योग्य वेळी निर्णय घेईल. निर्णय घेतल्यावर त्याची अंमबजावणी पुणे विभागात होईल.
मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे