पुणे : सवाई गंधर्व महोत्सवासाठी येणाऱ्यांना बसची खास सुविधा केली जाते. मात्र मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांना स्वत:च्या वाहनानेच नियुक्त केलेल्या क्षेत्रीय कार्यालयापर्यंत जावे लागले. राहत्या ठिकाणापासून २५ ते ३० किलोमीटर अंतरावरून महिला कर्मचाऱ्यांना बस, रिक्षाने किंवा स्वत:च्या वाहनावरून जावे लागले.ज्येष्ठ महिलांना या निवडणुकीसाठी तैनात करण्यात आले आहे. महिला पोलिसांचाही त्यात समावेश आहे. नऱ्हे भागात राहणाऱ्या एका महिला शिक्षिकेला बसने पुणे स्टेशनपर्यंत, तेथून रिक्षाने वडगाव शेरीमधील राजाराम पठारे स्टेडियमपर्यंत जावे लागले. तर माणिकबाग परिसरात राहणाऱ्या अन्य एका शिक्षकाला स्वत:च्या दुचाकीवरून या केंद्रापर्यंत पोहोचावे लागले.या क्षेत्रीय निवडणूक कार्यालयात सुमारे १००० कर्मचारी सकाळी साडेआठच्या सुमारास होते. त्यांना साधा चहा देण्याचे सौजन्य निवडणूक कार्यालयाने दाखवले नाही. पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नव्हती. त्यामुळे स्वत:च्या खर्चानेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या त्यांनी आणल्या.सकाळी साडेआठ वाजता हजर झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण साडेदहा वाजता सुरु झाले. त्यानंतर दुपारी दोननंतर त्यांना मतदानयंत्रे व तत्सम साहित्य घेऊन बसने मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले. या कर्मचाऱ्यांमध्ये काही आजारी महिला होत्या. (प्रतिनिधी)अमराठी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे प्रश्नकेंद्र सरकारच्या एलआयसी किंवा तत्सम कंपन्यांचे कर्मचारीही पालिका निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आले असून, एका केंद्रामध्ये नियुक्त झालेल्या अमराठी केंद्रप्रमुखांना मराठी येत नसल्याने त्यांचे काम अन्य कर्मचाऱ्यांनाच करावे लागले. निवडणुकीसाठी दिली जाणारी प्रशिक्षण पुस्तिका हिंदी भाषेत असल्यास अशी अडचण येणार नाही, अशी प्रतिक्रिया या केंद्रामधील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. रात्री झोपण्याची, जेवणाची सुविधा या कर्मचाऱ्यांना स्वत:च करावी लागणार असून, मंगळवारी सकाळी अंघोळीची, प्रातर्विधीची सुविधा नसल्याने त्यांचे हाल होणार आहेत. एकमेकांशी सहकार्य करून हे कर्मचारी घर जवळ असल्यास पहाटे घरी जाऊ शकतील. दूर अंतरावर राहणाऱ्यांना मात्र असुविधेला तोंड द्यावे लागणार आहे. मतदान संपल्यानंतर रात्री उशिरा या उमेदवारांना क्षेत्रीय कार्यालयांपर्यंत बसने पोहोचविले जाईल. त्यानंतर त्यांना स्वत:च्या वाहनाने किंवा बसने घरापर्यंतचा प्रवास करावा लागणार आहे. सवाई गंधर्व महोत्सवासाठी येणाऱ्या रसिकांसाठी रात्री ११पासून खास बससेवा दिली जाते, राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशी सुविधा देण्याचे गांभीर्य का नाही, अशी प्रतिक्रिया या यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.
कर्मचाऱ्यांना प्रवासाचा ताण
By admin | Published: February 21, 2017 3:32 AM