पुणे : सिंहगड एक्सप्रेसने अनेकदा मुंबई ते पुण्यादरम्यान ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी शनिवार आणि रविवार हे दोन दिवस अभुतपुर्व त्रासाचे ठरले. यापुर्वी या प्रवाशांना कधीच अशा मनस्तापाला सामोरे जावे लागले नव्हते. मुंबईतून शनिवारी सायंकाळी ५.५० वाजता निघणारी सिंहगड एक्सप्रेस रविवारी रात्री उशिरापर्यंत पुण्यात पोहचली नव्हती. पावसामुळे ही गाडी कल्याणमधून कसारा मार्गे वळविण्यात आली, पण हा मार्गही बंद झाल्याने प्रवासी मधेच अडकून पडले. परिणामी, तब्बल ३० तासांनंतरही ही गाडी पुण्यात पोहचू शकली नाही.
मुसळधार पावसामुळे शनिवारी मुंबईतील रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. पण मुंबई ते पुणे दरम्यानची वाहतुक धीम्या गतीने सुरू होती. डेक्कन क्वीन व सिंहगड एक्सप्रेस या गाड्या नियमित वेळेपेक्षा तीन ते साडे तीन तास विलंबाने निघाल्या. डेक्कन क्वीन कर्जतजवळील भिवपुरी येथे आल्यानंतर मंकी हिल परिसरात रेल्वेमार्गावर दरड कोसळली. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास प्रवाशांना ही माहिती देण्यात आली. ही गाडी माघारी वळवून पहाटे ३ वाजता कल्याण स्थानकात आली. प्रवाशांना सिंहगड एक्सप्रेसमध्ये हलविण्यात आले. ही गाडी ३.४५ वाजता कसारामार्गे वळविण्यात आली. पण पहाटे ५.३० च्या सुमारास उंबराली स्थानकाजवळ थांबविण्यात आली. तेव्हापासून दुपारी ४ वाजेपर्यंत ही गाडी तिथेच होती, अशी माहिती सिंहगडमधील प्रवासी शाहरूख इराणी यांनी दिली.
कसारा घाटामध्ये दरड कोसळल्याने हा मार्गही रात्रीपासून बंद होता. त्यामुळे सिंहगड एक्सप्रेस पुढे जाऊ शकली नाही. या स्थितीमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. गाडीतील प्रवासी परेश पडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, उंबराली स्थानकात जवळपास १३ तास गाडी उभी होती. प्रवाशांकडील पाणी व खाण्याचे पदार्थही नाहीत. अनेकांना औषधे घ्यायची होती, पण काही खायला नसल्याने त्यांना घेता आले नाही. रेल्वेकडून काही माहिती मिळाली नाही. आम्ही दुपारी सुमारास गाडीतून उतरून तिथेच खाण्याची व्यवस्था होतेय ते पाहिले. तर दुपारी ३ वाजता बस शोधल्या. तेथील एका नगरसेवकाने तीन बसची व्यवस्था केली. त्यासाठी प्रत्येकाने ३०० रुपये दिले. ही बस कल्याण, पनवेल मार्गे पुण्याकडे निघाली आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, ही गाडी पहाटे २ वाजता पुण्यात दाखल होईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.
दरड काेसळल्याने घाट बंद दरड कोसळल्याने कसारा घाट बंद होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दरड हटवून रेल्वेगाड्यांचे संचलन सुरू करण्यात आले. सुमारास १२ तास प्रवासी एकाच जागेवर होते. प्रवाशांना पाणी व खाण्याची व्यवस्था करण्यात आली.- रेल्वे प्रशासन
पहिल्यांदाच कसारामागे वळविलीमुंबईहून पुण्याकडे धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती व इतर इंटरसिटी एक्सप्रेल यापुर्वी कधीही कसारामार्गे सोडण्यात आल्या नाहीत. घाटामध्ये दरड कोसळल्यास या गाड्या रद्द केल्या जातात. पण शनिवारी पहिल्यांदाच सिंहगड एक्सप्रेसला कसारामार्गे वळविण्यात आले. पुण्याकडे येण्यासाठी हा मार्ग खुप दुरचा आहे. प्रवाशांची कल्याणमधूनच बसद्वारे पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते. हे प्रवासी रविवारी सकाळी पुण्यात पोहचले असते. पण रेल्वेकडून प्रवाशांचा विचार करण्यात आला नाही. केवळ ही गाडी पुण्यात कशीही पोहचविण्यासाठी प्रयत्न केले गेले.- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप