पुणे: नाशिक येथून पुण्याला बसने येणाऱ्या ज्येष्ठाचे २० हजार रुपये रोख आणि सोने-चांदीचे दागिने असा २ लाख ९३ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ७ ऑगस्टला नाशिक-पुणे बस प्रवासात घडली. याप्रकरणी नाशिक येथील ७३ वर्षीय ज्येष्ठाने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नाशिकमधील रहिवासी असून ७ ऑगस्टला ते बसने प्रवास करत होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवत २० हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा २ लाख ९३ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदूम करत आहेत.
पीएमपीत चोरली सोन्याची बांगडी
पीएमपी बस प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या हातातील ६५ हजारांची सोन्याची बांगडी कापून नेली. ही घटना ८ ऑगस्टला संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास शिवाजीनगर ते राजस सोसायटी कात्रज मार्गादरम्यान घडली आहे. याप्रकरणी ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी महिला या धनकवडी परिसरात राहायला असून ८ ऑगस्टला पुणे महानगरपालिकेजवळील पीएमपी बसस्थानकातून बालाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या बसमधून प्रवास करत होत्या. त्यावेळी बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या हातातील ६५ हजारांची सोन्याची बांगडी कापून नेली. काही अंतर बस पुढे गेल्यावर महिलेला सोन्याची बांगडी हातात नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अंमलदार पवार करत आहेत.