पुणे : नाशिक येथे झालेल्या ट्रॅव्हल्स अपघातामध्ये संबंधित ट्रॅव्हल्सचे फिटनेस सर्टिफिकेट नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे अनेक प्रश्न खासगी प्रवासी वाहतुकीसंदर्भात उभे राहिले आहेत. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना आता पुन्हा खासगी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार. त्यामुळे या प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी संबंधित खासगी बस चालवणाऱ्या मालकांसह आरटीओ घेईल का, हादेखील प्रश्न आहे.
फिटनेस प्रमाणपत्र पाहिले जाते का?
पुणे शहरात ४३ लाखांपेक्षा अधिक वाहने आहेत. शहरातून शेकडो खासगी बसद्वारे प्रवासी वाहतूक होत असते. आरामदायी, वातानुकूलित आणि स्वच्छता यामुळे अनेक नागरिक खासगी बसचा पर्याय निवडतात. पण, यावेळी त्या बसचे फिटनेस प्रमाणपत्र आरटीओच्या वायुवेग पथकांकडून तपासले जाते का, हा खरा प्रश्न आहे. आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वेळोवेळी ते अशा बसच्या कागदपत्रांची तपासणी करीत असतात, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अग्निशमन यंत्रणा पाहतो कोण?
अनेकदा खासगी बसची तपासणी करताना चालकाचे लायसन्स, इन्श्युरन्स, फिटनेस बघितले जाते. पण, यावेळी अग्निशमन यंत्रणा आहे का, हे पाहणेदेखील गरजेचे असते. पुणे आरटीओ विभाग दरमहिन्याला अशा वाहनांवर कारवाई करीत असतो. आरटीओ आणि पोलीस विभागाला ही तपासणी करण्याचा अधिकार असतो.
चालक दोन असतात का?
लांब पल्ल्याच्या खासगी बसमध्ये दोन चालक असतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सगळेच खासगी बसचालक हा पर्याय निवडतात. यामुळे बसची देखभाल व्यवस्थित ठेवता येते आणि एकाच चालकावर ताण येत नाही. पण, यामध्ये ते संबंधित चालक प्रशिक्षित असतात का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
महिनाभरात १०० वाहनांवर कारवाई
नियमांचे पालन कितीही योग्यरीतीने केले जात असले तरी अनेकदा एखाद्या गोष्टीची कमतरता राहतेच. पुणे आरटीओ विभागाअंतर्गत ४ वायुवेग पथके असून, ते दिवसा-रात्री खासगी वाहनांची तपासणी करीत असतात. महिन्याला साधारण १०० वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, खासगी वाहनांची संख्या लक्षात घेता, वायुवेग पथकांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे यावरून दिसून येते.