पुणे : फूटपाथवर गाडीची वाट बघत असलेल्या एका तरुणाला चाकू व ब्लेडचा धाक दाखवून मारहाण करत, पाच जणांच्या टोळक्याने लुटले. ही घटना मंगळवारी (दि.९) पहाटे तीनच्या सुमारास रेल्वे स्टेशन जवळील बस स्टॅण्डजवळ घडली. या प्रकरणी, बंडगार्डन पोलिसांनी दीप उर्फ राजू सुखलाल सरकार (वय २१, रा.कुंभारवाडा केशवनगर), मंगशे अशोक गव्हाणे (वय ३२, रा.मुंढवा), मनोज सूरज पराते (वय २६, रा.केशवनगर मुंढवा) या तिघांना अटक केली असून, त्यांच्यासह पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. याबाबत गौतम कुमार (वय २०, रा.कराड, जि. सातारा) याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौतम हा त्याचे मित्र सोनू कुमार व त्रिभुवन यांच्यासोबत रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या बस स्टॅण्डच्या शेजारी असलेल्या स्वामी समर्थ मंदिराजवळील फुटपाथवर गाडीची वाट पाहत बसला होता. त्यावेळी रिक्षातून आलेल्या पाच जणांच्या टोळक्याने त्यांना गाठले. त्यानंतर, आरोपींनी त्यांच्याकडील ब्लेड व चाकूचा धाक दाखवून फिर्यादी व त्यांच्या मित्राजवळील १० हजार १०० रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावली. त्यानंतर, फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती. या दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून पोलिसांनी तिघांना अटक केली असून, इतर दोघांचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी करत आहेत.
--------------------------------------------------------