कल्याणराव आवताडे, धायरी: मुंबई- बंगळुरू महामार्गावर खासगी बस व ट्रक चा भीषण अपघात झाला असून ट्रक बसवर आदळल्याने झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २२ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी ससूनमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघात पुण्यातील जांभूळवाडी दरी पुलाजवळील स्वामी नारायण मंदिराजवळ रविवारी पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमाराला घडला. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर चारजणांचे मृतदेहही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,कोल्हापूरहुन मुंबईकडे साखरेची पोती घेऊन निघालेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर चाललेल्या ट्रॅव्हल्सला पाठीमागून ट्रकने जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक व ट्रॅव्हलचे केबिन चक्काचूर झाले. पहाटे सर्व प्रवासी बसमध्ये गाढ झोपेत असतानाच अचानक हा अपघात झाला. त्यामुळे प्रवाशांची भंबेरी उडाली. यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा अशा चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस व अग्निशमन दलाचे जवानानी तत्काळ घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले.
अग्निशमन दलाचे मदतकार्य...
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून पुणे महानगरपालिकेची ४ अग्निशमन वाहने व १ रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीए कडून १ रेस्क्यु व्हॅन अशी एकुण ७ अग्निशमन वाहने जवानांसह घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले. दलाचे अधिकारी व जवानांनी प्रथमत: बसच्या मागील बाजूची काच फोडून व काही जवान वरील बाजूस जाऊन रश्शीचा वापर करीत जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. तसेच पुढील बाजूस काही महिला व एक अंदाजे पंधरा वर्षाची मुलगी अडकली असता जवानांनी तिला अतिशय जिकरीचे प्रयत्न करीत जखमी अवस्थेत बाहेर काढले. अग्निशमन दलाकडून एकुण १८ जखमींना बाहेर काढले असून त्यांना शासनाच्या १०८ या रुग्णवाहिकेतून जवळपास असणारया रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. अग्निशमन दलाकडील नवले, सिंहगड, काञज, कोथरुड येथील फायरगाड्या व मुख्यालयातून एक रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीए १ रेस्क्यु व्हॅन दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाकडून विविध अग्निशमन उपकरणे स्प्रेडर, कटर, लिफ्टिंग बॅग, पहार, कटावणी, फुट पंप वापरण्यात आली आहेत.
ट्रकच्या केबिनचा चक्काचूर
नीता ट्रॅव्हल्सची बस कोल्हापूरहून डोंबिवलीला जात होती. तर मालवाहतूक करणारा ट्रक कोल्हापूरहून अंबरनाथकडे जात होता. भरधाव असलेल्या मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक थेट खासगी ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला.
जखमी व मृत प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरू
दरम्यान, अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. मात्र रात्रीचा अंधार असल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. अपघातातील इतर प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे तसेच अपघाताचा पंचनामा करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याशिवाय अपघातातील जखमी आणि मृत प्रवासी मुंबईचे होते की कोल्हापूरचे याची ओळख पटवली जात आहे.