पुणे : पायाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पूना हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या १४ वर्षांच्या मुलाचा शस्त्रक्रिया करताना १४ जून राेजी मृत्यू झाला. हाॅस्पिटलमधील डाॅक्टरांनी उपचारांत हलगर्जीपणा केल्याचा आराेप करत त्याप्रकरणी कुटुंबीयांनी विश्रामबाग पाेलिस ठाण्यात हाॅस्पिटलविरुद्ध लेखी तक्रार दिली आहे. पाेलिसांकडून याबाबत अधिक तपास करण्यात येत असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
याप्रकरणी मुलाचे वडील सुबाेध मुरलीधर पारगे (वय ४६, रा. डाेणजे, ता. हवेली) यांनी पूना हाॅस्पिटलविरुद्ध पाेलिसांकडे तक्रार दिली आहे. पारगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा स्वराज हा ११ जून राेजी क्लासवरून रिक्षाने येत हाेता. खडकवासला चाैपाटी येथे रिक्षाला दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने त्याच्या उजव्या मांडीला दुखापत झाली हाेती. त्यानंतर त्याला पूना हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्याचा एक्सरे काढल्यावर त्याची शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डाॅक्टरांनी त्यांना सांगितले. त्यासाठी ९० हजार रुपयांचा खर्चही सांगितला.
दरम्यान, पारगे यांनी ३० हजार रुपये भरले आणि उर्वरित शस्त्रक्रिया झाल्यावर भरण्याची विनंती केली. डाॅक्टरांनी स्वराजला १४ जूनला शस्त्रक्रिया करण्यासाठी सकाळी ७ वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले. अकरा वाजता डाॅक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले की, ‘‘स्वराजला भुलीच्या इंजेक्शनची रिॲक्शन आली असून त्याच्या हृदयाचे ठाेके वाढले आहेत. असे अडीच लाखपैकी एका पेशंटला हाेऊ शकते आणि त्यासाठी आम्ही औषधे लिहून देताे. ती औषधे मुंबई किंवा दिल्ली येथे मिळतात. कमीत कमी दहा ॲम्प्यूल घेऊन या.’’
नातेवाईक ती औषधांची चिठ्ठी घेऊन मुंबईकडे रवाना झाले असता दुपारी चार वाजता स्वराजचे डायलिसिस करावे लागेल, असे सांगत ८० हजार भरा, अन्यथा डायलिसिस करणार नाही, असे सांगितले. त्यानंतर नातेवाइकांनी पैशांची जुळवाजुळव करत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हाॅस्पिटलचे डाॅ. पत्की यांनी स्वराजची आई शीतल यांना औषधे आणू नका कारण स्वराजचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी हाॅस्पिटलमधील डाॅक्टर आणि हाॅस्पिटल प्रशासनावर कारवाई करावी, असे स्वराजचे वडील सुबाेध पारगे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याबाबत पूना हाॅस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
संबंधित मुलाच्या मृत्यूप्रकरणी हॉस्पिटलच्या विरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा अहवाल आम्ही ससून रुग्णालयाच्या समितीकडे त्यामध्ये निष्काळजीपणा झाला की नाही, याची खात्री करण्यासाठी पाठवला आहे. ताे अहवाल आल्यानंतर जर निष्काळजीपणा झाला असेल तर याेग्य ती कारवाई करण्यात येईल. सध्या या प्रकरणात आकस्मात मृत्यूची नाेंद केलेली आहे. - संदीपसिंह गिल्ल, पाेलिस उपायुक्त, झाेन एक