पुणे: आजारी, कमी वजनाच्या नवजात बालकांवर उपचार करण्यासाठी राज्यातील सार्वजनिक आराेग्य विभागातील रुग्णालयांत ५३ विशेष नवजात काळजी कक्ष (एसएनसीयु) आहेत. या ‘एसएनसीयु’मध्ये गेल्या वर्षभरात ५० हजार गंभीर आजारी बालकांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये एक किलाेपेक्षा कमी वजन असलेल्या १३९ तर एक ते दीड किलाे वजनाच्या २ हजार ३६३ नवजात बालकांवर माेफत उपचार करण्यात आले आहेत. या नवजात आजारी बालकांसाठी ‘एसएनसीयु’ संजीवनी ठरत आहे.
खासगी रुग्णालयात नवजात बालकांवरील उपचार प्रचंड महागडे आहेत. दरदिवशी १० हजार ते २५ हजार रूपये इतका प्रचंड खर्च येउ शकताे. मात्र, याच ताेडीचे उपचार जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या ५३ ‘एसएनसीयु’ रुग्णालयात माेफत हाेतात हे विशेष. त्यामुळे गाेरगरिब किंवा ज्यांच्याकडे पैसेच नाहीत त्यांच्या बाळांसाठी हे ‘एसनएनसीयु’ जीवनदाते ठरले आहेत.
या ‘एसएनसीयु’मध्ये आजाराच्या तीव्रतेनुसार अर्भकांचे वर्गीकरण (ट्रायेज) करण्यात येते. येथे आजारी नवजात अर्भकांना प्रामुख्याने हायपोथर्मिया (शरीर थंड पडण्यावरील उपचार) , सेप्सिस इन्फेक्शन (जळजळ निर्माण करणारा रक्तप्रवाहातील एक गंभीर संसर्ग), कावीळीवरील उपचार, ज्या गंभीर नवजात बालकांना श्वास घेण्यासाठी त्रास हाेताे त्यांच्याकरता ‘नॉन-इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन’ (सीपॅप), अकाली जन्मलेल्या अर्भकासाठी सर्फेक्टंट यासारख्या सेवा पुरवल्या जातात.
कशी आहे एसनएनसीयु ची रचना
-एका युनिट्समध्ये १ बालरोगतज्ञ, २ वैद्यकीय अधिकारी, १ इनचार्ज सिस्टर, १२ परिचारिका, १ डेटा ऐंन्ट्री ऑपरेटर आणि ४ सहाय्यक कर्मचारी असतात.- किमान १२ ते १६ खाटा असून, नवजात किंवा विशेष काळजी आवश्यक असणाऱ्या बालकांसाठी चोवीस तास सेवा देतात.- या युनिटमध्ये रेडियंट वॉर्मर, फोटोथेरपी युनिट, इन्फ्युजन पंप, सीपॅप मशिन, मॉनिटर्स यांसारख्या वैद्यकीय उपकरणे असतात.