पुणे: आषाढी वारीनिमित्त राज्यातून वेगवेगळया ठिकाणाहून निघालेल्या महत्वाच्या २८ पालख्यांच्या प्रस्थानापासून १४ जुलैपर्यंत एकुण ७ लाख ५ हजार वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्यापैकी ३ हजार ८२० रुग्णांवर आंतररुग्ण विभागात उपचार केले आहेत. त्यापैकी संत ज्ञानेश्वरांच्या पालखीत सर्वाधिक ३ लाख ३९ हजार वारक-यांवर उपचार करण्यात आले आहेत.
विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' हा उपक्रम राबवीत आहे. आरोग्य विभागाने सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांना पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पंढरपूर येथे मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखाना तयार केला असून ६ हजार ३६८ आरोग्य अधिकारी, कर्मचारी आरोग्य सेवा पुरवत आहेत, अशी माहीती पुणे परिमंडळचे आराेग्य उपसंचालक डाॅ. राधाकिशन पवार यांनी दिली.
तात्पुरत्या रुग्णालयात दाखल करून ३ हजार ८२० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. पालखी आणि दिंडी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी ५ खाटांचे तात्पुरते अतिदक्षता कक्ष (आयसीयु) तयार केले आहेत. येथे ऑक्सिजन, मॉनिटर, औषधी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. गर्दीमध्ये मोठी ॲम्ब्युलन्स फिरु शकत नसल्याने ताप, सर्दी, खोकला, ड्रेसींग, जुलाबाचा त्रास कोणाला होत असेल तर त्यासाठी फिरत्या बाईक अॅम्बुलन्सदेखील तैनात ठेवण्यात आल्या आहेत.
फिरत्या अॅम्बुलन्सबरोबरच १०२ व १०८ या रुग्णवाहिका पालखी मार्गावर सेवा देण्यासाठी कार्यरत आहेत. तसेच पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात आली आहे. याबरोबरच स्तनदा मातांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोय करण्यात आली आहे.