पुणे : मेट्रोच्या कामाकरिता आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण असताना पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. येत्या 17 तारखेला मोदी यांची पुण्यात सभा आहे. टिळक रस्त्यावरील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा पार पडणार आहे. त्याकरिता व्यासपीठाच्या जवळील आणि सुरक्षेला अडथळा निर्माण करणारी झाडे कापण्यात आली आहेत. यात साधारण 20 झाडांचा समावेश आहे.
याबाबत शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन म्हणाले की, व्यासपीठाजवळ 16 झाडे होती. त्यामध्ये बाभळीची झाडे होती. पुणे महापालिकेच्या परवानगीने ही झाडे कापण्यात आली. दोन झाडे तशीच असून एक झाड पावसामुळे पडल्याचे स्पष्ट करत त्यांनी यात काही चुकीचे नसल्याचेही सांगितले.
दरम्यान, 14 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सिंहगड रस्त्यावरील झाडे कापण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई करणार असल्याचे आश्वासनही हवेत विरले आहे. दुसरीकडे या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली असून खासदार वंदना चव्हाण यांनी आयुक्त सौरभ राव यांनी पत्र देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.