लोकमत न्यूज नेटवर्कखोडद : ‘‘आजचा माणूस परमेश्वराचं निर्गुण आणि निर्विकार रूप शोधत आहे. परमेश्वरच्या दर्शनासाठी माणूस तीर्थक्षेत्र यात्रा करत आहे. एखाद्या ठिकाणी वृक्ष तोडून जर मंदिर बांधले जात असेल तर त्या मंदिरात परमेश्वराचा वास कधीच राहणार नाही. पण एखाद्या मंदिराच्या आजूबाजूला व परिसरात जर झाडे लावली तर त्या परिसरात आणि मंदिरात परमेश्वराचा वास किंवा सकारत्मक ऊर्जा नक्कीच निर्माण होते. आपले पर्यावरण हेच खऱ्या अर्थाने एक मंदिर आहे आणि पर्यावरणातील विविध वृक्ष हेच परमेश्वराचं जिवंत रूप आहे, असे प्रतिपादन जुन्नरचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांनी व्यक्त केले.दुर्गप्रेमी-निसर्गमित्र ग्रुपतर्फे येथील महात्मा फुले विद्यालय व हिवरे येथील कुलस्वामी खंडेराय विद्यालय तसेच खोडद व हिवरे ग्रामस्थ यांच्या संयुक्त श्रमदानातून नारायणगड परिसरातील वनक्षेत्रात विविध देशी झाडांच्या बियांचे बीजारोपण करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी मार्गदर्शन करताना अर्जुन म्हसे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘वृक्ष आणि पर्यावरण हे मानव जातीसाठी सदैव परोपकरी आहेत. एखादा माणूस जेव्हा आजारी पडतो, तेव्हा हॉस्पिटलमध्ये त्याला कृत्रिम प्राणवायू देऊन त्याला जगविण्याचा प्रयत्न केला जातो. पण निसर्गातील ही झाडे आपल्याला आपल्या जन्मापासून आयुष्यभर आॅक्सिजन मोफत देतात याची आपल्याला जाणीव राहिली नाही. आपण निसर्गाशी कृतज्ञता न बाळगता कृतघ्न झालो आहोत ही गंभीर बाब आहे.’’या वेळी खोडदचे ओतूर वनविभागाचे क्षेत्र अधिकारी सचिन रघतवान, सरपंच विजय गायकवाड, उपसरपंच ज्योती मुळे, ग्रामपंचायत सदस्य विश्वास काळे, वृक्षमित्र जालूभाऊ कोरडे, तुषार आंधळे, संतोष मुळे, नारायणगड संवर्धन समितीचे अध्यक्ष शिवदास खोकराळे, हिवरे गावचे सरपंच स्वरूपा विधाटे, उपसरपंच सुधीर खोकराळे, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण शिंदे, उपाध्यक्ष सुनील गायकवाड, डॉ. संतोष वायाळ, दिलीप भोर, शिवदास विधाटे, कुलस्वामी खंडेराय विद्यालयाचे मुख्याध्यापक टी. बी. वागदरे, विशाल भोर, नीलम खोकराळे, ओम खैरे, सलीम तांबोळी उपस्थित होते. हिवरे येथील कुलस्वामी खंडेराय विद्यालयातील व खोडद येथील महात्मा फुले विद्यालयातील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी या बीजारोपण मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. बीजारोपण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व ग्रामस्थांनी वनभोजनाचा आनंद घेतला.
पर्यावरणात वृक्ष हेच परमेश्वराचं जिवंत रूप
By admin | Published: July 02, 2017 2:03 AM