पुणे: पुणे शहरात अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल बरसायला सुरुवात केली. मध्यम स्वरूपाच्या पावसाने पुणेकरांची तारांबळ उडालीच होती. पण त्यातून रस्ते घसरडे झाल्याने छोटे अपघातही झाले. अशाच परिस्थितीत शहरातील मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरात झाड पडण्याच्या नऊ घटना घडल्या आहेत. अशी नोंदी अग्निशमन दलाकडे आतापर्यंत आल्या आहेत.
शहरात सकाळपासूनच मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली होती. महापालिकेने सोमवारपासून निर्बंधात सूट दिल्याने नागरिक सकाळपासूनच बाहेर पडले होते. पण अचानक सुरू झालेल्या पावसाने वाहतूक कोंडी, घसरडे रस्ते याला सामोरे जावे लागले. दिवसभर पाऊस पडत असल्याने लहान मोठे अपघात घडतच होते. शहरात मुसळधार पाऊस झाल्यावर झाड पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर होतात. अशा पावसात शक्यतो झाडपडीच्या घटना घडत नाहीत. परंतु कालपासून अग्निशमन दलाकडे नऊ नोंदी झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना सतर्क राहण्याचे आवाहन अग्निशमन दल आणि पोलिसांकडून करण्यात येत आहे.
मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरात पडली झाडे
गणेश खिंड रस्ता, पर्वती लक्ष्मीनगर रमणा गणपती जवळ, सहकारनगर शिंदे हायस्कुल समोर, प्रभात रस्ता गल्ली क्रमांक ३, सेनापती बापट रस्ता सेल पेट्रोल पंपाजवळ, कोथरूड आयडियल कॉलनी, सदाशिव पेठ लज्जत हॉटेलजवळ, खडकी रस्ता रॉयल सोसायटी समोर, कोथरूड उजवी भुसारी कॉलनी या भागात झाडपडी आणि फांदी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.