पुणे : पुणे - सातारा रस्त्यावरी आदीनाथ साेसायटी येथे पिंपळाचे भलेमाेठे झाड काेसळले. एका चारचाकीवर हे झाड काेसळल्याने चारचाकीचे माेठे नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलिही जीवित हानी झाली नाही.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणच्या झाडपडीच्या घटना समाेर आल्या आहेत. आज सातारा रस्ता येथील आदिनाथ साेसायटीमध्ये असलेले पिंपळाचे झाड दुपारी बाराच्या सुमारास अचानक काेसळले. या झाडाच्या जवळ असणाऱ्या आय ट्वेंण्टी या चारचाकीवर हे झाड काेसळले. चारचाकीच्याबराेबर मधाेमध हे झाड काेसळल्याने चारचाकीचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने त्यावेळी चारचाकीत काेणी नव्हते. तसेच झाड पडले तेव्हा आजूबाजूला काेणी नसल्याने माेठी जीवित हानी झाली नाही.
या घटनेमुळे आदिनाथ साेसायटीचा रस्ता बंद झाला हाेता. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड कापून रस्ता माेकळा केला. पावसामुळे झाडपडीच्या घटना घडत असल्याने झाडाखाली गाडी लावने किंवा थांबणे धाेक्याचे झाले आहे.