पुणे: तळजाईवर झालेल्या वृक्षतोडीबाबत पुणेकरांची वन भवनमध्ये वन अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यामध्ये नागरिकांनी प्रश्नांचा भडिमार केला आणि अधिकारी निरूत्तर झाले. तळजाईवर झालेल्या वृक्षतोडीबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणीच नागरिकांनी केली. त्यानंतर बराच काळ तणावाचे वातावरण होते. अखेर काहीच तोडगा निघाला नाही आणि बैठक संपविण्यात आली.
तळजाईवर वृक्षतोड झाली, त्याबाबत वन विभागाच्या वतीने नागरिकांची व स्वयंसेवी संस्थांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये पन्नासहून अधिक नागरिक सहभागी झाले. वन भवनमध्ये बैठकीला मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण, निवृत्त ज्येष्ठ वनअधिकारी सत्यजित गुजर, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक दीपक पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, लोकेश बापट, अमित अभ्यंकर, अमित सिंग आदी उपस्थित होते.
तळजाईवर वृक्षतोड करताना कोणाची परवानगी घेतली, एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड का केली जात आहे? ग्लिरीसीडिया सोबतच इतर देशी झाडांवरही कुऱ्हाड का घातली? या तोडीचा हिशेब द्यावा, संबंधितांवर गुन्हे दाखल करा, यापुढे एकही वृक्षतोड करू नका, अशा प्रश्नांचा भडिमार केला. त्यावर वन अधिकाऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, स्थानिक लोकांना सोबत घेऊन वन व्यवस्थापन समितीची स्थापना केली जाईल, असे आश्वासन दिले.
तळजाई टेकडीवर आतापर्यंत वृक्षतोड झाली. यापुढे एकही झाड तोडले जाणार नाही. वन व्यवस्थापन समित्या झाल्यानंतरच नियोजन करण्यात येईल. वन क्षेत्राचे संवर्धन लोकांच्या सहभागातून करणार आहोत. - एन.आर. प्रवीण, मुख्य वनसंरक्षक
गेल्या कित्येक वर्षांपासून नागरिक टेकडीसाठी रक्ताचे पाणी करून परिश्रम घेत आहेत. त्यावर स्वत:चा पैसा खर्च करत आहेत. त्यामुळे वन विभागाने आतापर्यंत कधीही लोकांना कोणत्याही कामात सहभागी करून घेतले नाही. तळजाईवर ६०० एकर क्षेत्र आहे; पण तिथे केवळ एक गार्ड आहे. अधिकारी कधीच तिथे भेट देऊन पाहणी करत नाहीत. आठवड्यातून किमान एकदा तरी अधिकाऱ्यांनी येऊन भेट द्यावी. सिमेंटीकरण करू नये. - लोकेश बापट, संस्थापक, टेल्स ऑर्गनायझेशन
वृक्षतोडीचा अहवाल आम्हाला द्या, संबंधितांवर कारवाई करा. लोकच आतापर्यंत पुण्यातील हिरवाई जपत आहेत. अधिकाऱ्यांचे नेहमीच दुर्लक्ष होते. - विवेक वेलणकर, सामाजिक कार्यकर्ते