कोरोना महामारीमुळे खाटपेवाडी या परिसरातील आणि भुकूम गावातील मृत पावलेल्या व्यक्तींच्या नावाने स्मृती मार्ग तयार केला आहे. या मार्गावर खाटपेवाडी तलावाच्या उजव्या कडेच्या बाजूने वृक्षारोपण-संवर्धनाच्या कार्यक्रमाचे सोमवारी आयोजन केले होते. या वेळी संयोजक वीरेंद्र चित्राव, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, भुकूमच्या सरपंच रेखा वाघ, उपसरपंच सचिन आंग्रे, माजी सरपंच नितीन कुडले, अनिल गायकवाड, सुवर्णा भांबुरकर, अर्जुन नाटेगावकर, नयनीश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. नारायण पांडू वाहळे, ज्ञानेश्वर खंडू कुडले, दत्तात्रय हरिभाऊ कुडले, किसन ज्ञानोबा वहाळे, कांताबाई संभाजी अडसूळ, दत्तात्रय परशुराम कुडले, विवेक युवराज भामरे, शरद भरत आंग्रे, जिजाबाई विठ्ठल आंग्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महापाैरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
मोहोळ म्हणाले की, आपल्या घरातील निधन झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून त्यांची स्मृती जतन करणे हा स्तुत्य उपक्रम असून, वृक्षारोपणाचे असे नानाविध सकारात्मक प्रकल्प राबून आपल्या लोकांच्या आठवणी जागृत ठेवण्याबरोबरच अप्रत्यक्षपणे पर्यावरण संवर्धनालाच आपण हातभार लावत आहोत.
चित्राव म्हणाले की, किर्लोस्कर वसुंधराच्या पुढाकारातून तयार झालेले राम नदी पुनरुज्जीवन अभियान गेली दोन वर्षे सुरु असून याद्वारे दुर्लक्षित अशा राम नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. राम नदीला गतवैभव प्राप्त व्हावे हीच इच्छा आहे.’’
अनिल गायकवाड म्हणाले की, परिसरातील खेडी, गावे आणि काही शहरीकरणाचा भाग असा हा परिसर आहे. आता पुणे मनपाच्या हद्दीत बरीच गावे समाविष्ट झाल्याने ह्या परिसरातील समाविष्ट झालेल्या भागाचे सांडपाणी नदीत अथवा तलावात न सोडता मुख्य वाहिनीला जोडणे गरजेचे आहे.
------------------