पुणे : वृक्ष लागवड करणे सोपे आहे, मात्र त्यापेक्षा त्याची देखभाल करणे तितकेच आव्हानात्मक काम आहे. या पुढील काळात प्रत्येक नागरिकाने किमान पाच झाडे लावण्याची जबाबदारी स्वीकारून वृक्षरोपणास हातभार लावला पाहिजे. वृक्षारोपण ही केवळ एकट्या वनखात्याची जबाबदारी नसून ती सर्वांची आहे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात बापट बोलत होते. याप्रसंगी आमदार विजय काळे, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक जितसिंग, पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, लक्ष्मी ए, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते.बापट म्हणाले, वृक्षारोपण सारख्या महत्त्वाच्या उपक्रमाचे श्रेय वनविभागाला द्यावे लागेल. भविष्यात पर्यावरणाचे स्वरूप काय असेल, किती भयानक परिस्थतीला आपणाला सामोरे जावे लागेल याचा अभ्यास करून त्यांनी वनीकरनाचा उपक्रम हाती घेतला आहे. समाजात गुटगुटीत निसर्ग फुलला पाहिजे यासाठी कुणा एकट्याचे प्रयत्न पुरेसे नसून त्यात सार्वजनिक पातळीवर एकजुटीने सामाजिक वृक्षारोपणाचा संदेश रुजायला हवा. याबरोबरच निसर्गाशी भांडण न करता त्याला सोबत घेऊन काम करण्याची गरज असून नागरिकांनी केवळ संकल्पावर विसंबून न राहू नये. खरे तर दहा वर्षांपूर्वीच पर्यावरणाच्या जनजागृती बद्दल विविध पातळीवर प्रयत्न व्हायला हवे होते . मात्र ते न झाल्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण कार्यक्रम हाती घ्यावा लागत आहे. अशा शब्दांत बापट यांनी विरोधी पक्षावर टीका केली. यावेळी उपस्थित अधिकारी, विद्यार्थी, नागरिक, कार्यकर्ते, स्वयंसेवक यांनी वृक्षप्रतिज्ञा घेतली. तसेच पालकमंत्री व अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वनाधिकारी सत्यजित गुजर यांनी आभार मानले.२०० झाडामागे नेमणार एक पालककेवळ झाडे लावून प्रश्न सुटणार नसून त्याची देखभाल करणे हा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. याकरिता शासनाच्या वतीने यापुढील काळात २०० झाडांमागे त्याचे संगोपन करण्याकरिता एक पालक नेमणार आहे. त्या झाडांचे पालकत्व घेणाऱ्या कुटुंबाला वर्षाला ५ हजार रुपये देण्यात येणार असून त्या झाडांच्या देखभालिची जबाबदारी त्या कुटुंबावर सोपविण्यात येणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले. हे पालकत्व म्हणजे वृक्षारोपण उपक्रमाला भावनात्मक जोड देण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.प्रत्येक झाडाला जिओ टॅग करणारराज्यात सातत्याने कमी होत चाललेल्या वृक्षांची संख्या वाढविण्यासाठी वृक्षारोपण स्तुत्य उपक्रम असून आतापर्यंत जी झाडे लावण्यात आलेली आहेत त्यांच्या देखभालीसाठी त्या प्रत्येक झाडांवर जिओ टॅग लावणार असल्याची माहिती डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिली. यामुळे सबंधित झाड हे कुठल्या अवस्थेत आहे याची माहिती मिळण्यास मदत होणार असून जास्तीत जास्त वृक्षारोपण वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
वृक्षारोपण एकट्या वनखात्याची जबाबदारी नाही, ते सर्वांचे कर्तव्य- गिरीश बापट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2018 1:09 PM