पुणे : उन्हाचा कडाका वाढत असल्याने पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यात पाण्याअभावी अनेक ठिकाणी रोपे वाळून जात आहे. परंतु, काही टेकड्यांवर मात्र पर्यावरणप्रेमींकडून रोपांना वाचविण्यासाठी परिश्रम घेतले जात आहे. कोणी कॅँडने पाणी आणत आहे, तर कोणी पाइपने आणून रोपे जगवित आहेत. शहर व परिसरातील अनेक टेकड्यांवरील हजारो झाडे या नागरिकांच्या पाण्यांवर उन्हाळ्यातही तग धरून आहेत.उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्याचे काम अनेक टेकड्यांवर सुरू आहे. गेली २२ वर्षांपासून म्हातोबा टेकडीवर महेंद्र बागुल हे आपल्या मित्रांसह दररोज न थकता पायथ्यापासून कँडने पाणी टेकडीवर घेऊन जात आहेत. सुरवातीला त्यांच्यासोबत १५ लोक होते. आता ३० च्या जवळपास आहेत. तसेच अनेक टेकड्यांवर नागरिकांनी ग्रुप तयार करून झाडे जगविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या उन्हाळ्यात अधिक काळजी घ्यावी लागते. दररोज सकाळी व सायंकाळी टेकडीवर नागरिक फिरायला येत असतात. त्यातील काही जण सोबत पाण्याची बाटली किंवा कॅँड आणून ते झाडांना पाणी देतात. ========================म्हातोबा टेकडीवर काम करणारे महेंद्र बागुल म्हणाले, वन विभागाला सांगून आम्ही टेकडीवर पाण्याच्या टाक्या बसविण्यासाठी सांगितले होते. तेव्हा तत्कालीन मुख्य वनसंरक्षक जीत सिंग यांनी आमचे प्रयत्न पाहून टाक्या दिल्या. तेव्हा त्या टाक्या नियमितपणे भरल्या जात होत्या. पण आता त्या टाक्यात पाणी नियमित भरले जात नाहीत. किमान पंधरा दिवसाला एकदा तरी या टाक्यांमध्ये पाणी भरणे आवश्यक आहे. पण वन विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सध्या टेकडीवर सुमारे २५ टाक्या ठेवण्यात आलेल्या आहेत. देशी झाडांचे संवर्धन म्हातोबा टेकडीवर वड, पिंपळ, करंज, आंबा, कडू लिंब, पिंपरी, जांभूळ, शेवगा, सिताफळ,शिसम, हत्तीफळ, बकूळ, अशी अनेक प्रकारची देशी झाडे लावली आहेत व त्यांचे संवर्धन करत आहोत. या उपक्रमात दंडवते, के. आर. पाटील, पेशवे, विनोद कुलकर्णी, धूत, लिडबीडे, उपळेकर, आग्रे, कानगुडे, देवस्थळी, अंजली राय, शेडगे इत्यादींचा सहभाग असतो. म्हातोबा टेकडीवर आम्ही वृक्ष मंदीर बनवण्याचा ध्यास घेतला आहे. सुरवाती पासूनच प्रचंड अडचणी व विपरीत, नैसर्गिक परिस्थितीचा सामना करत आमचा उपक्रम सुरु आहे, स्वत: श्रमदान करून स्वच्छता,सपाटीकरण करणे,खड्डे घेऊन झाडे लावतो, त्यांची देखभाल करणे रोज स्वत: खालून कॅन, बाटल्यांनी झाडांसाठी पाणी दिले जाते, टेकडीचे सौंदर्य वाढवण्यासाठी सुशोभिकरण करणे इ. कामे केली जातात, असे महेंद्र बागुल यांनी सांगितले. ============================तळजाईवर वन विभागाचा कर्मचारीच नाही तळजाई टेकडीवर झाडांना पाणी देण्याची सुविधा नाही. कोणताही वन विभागाचा येथे कर्मचारी नाही. माणसं नसल्याचे कारण वन विभाग देते. त्यामुळे नागरिकच झाडे जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कँडने किंवा बाटलीत पाणी आणून ते झाडांना दिले जाते. टेल्स आँर्गनायझेशनतर्फे ५० ते ६० तळी करण्यात आली आहेत. त्यात पर्यावरणप्रेमी पाणी आणून टाकत आहेत. तळजाईवर जो ट्रॅक तयार केला आहे. त्या ठिकाणी महापालिका टँकरने पाणी आणून टाकते. परंतु, हे पाणी केवळ त्या ट्रॅकपुरतेच असते. पण आत वन परिसरातील झाडांना पाणी मिळत नाही. महामेट्रोने काही भागात झाडे लावली आहेत. त्यांना ते पाणी देत आहेत. आम्ही तळजाईच्या आतील झाडांना पाइपने पाणी द्यावे, असे वन विभागाला सांगितले. पण वन विभाग त्याकडे लक्ष देत नाही. म्हणून नागरिक आणि संस्था आपापल्या परीने पाणी देत आहेत, असे टेल्स ऑर्गनायझेशनचे लोकेश बापट यांनी सांगितले. ===============================
निसर्गराजा मित्र जीवांचेतर्फे इतक्या झाडांचे संवर्धन अय्यप्पा टेकडी, देहूरोड : 1500+ झाडे हिवरे, सासवड : 3000+ झाडेउदाची वाडी, सासवड: 2000+ झाडेवडगाव हवेली : 1000 झाडे अजून पाण्याच्या टॅँकरची गरज अय्यप्पा टेकडीसोडून सर्व ठिकाणी झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन व्यवस्था करण्यात आली आहे. वडगाव हवेली येथे पाण्याची सोय आहे. परंतु बाकी ३ ठिकाणी आपल्याला पाण्याची व्यवस्था टँकर द्वारे करावी लागते आहे. येत्या काळात ऊन वाढत जाणार आहे. त्यामुळे झाडांना आठवड्यातून दोनदा पाणी देणे अपेक्षित आहे. एका 10 हजार लिटर क्षमतेच्या टँकर मधून आपली एका ठिकाणची आठवड्याची पाण्याची गरज पूर्ण होते. एका आठवड्यात या तीनही ठिकाणी मिळून ३ टँकर ची गरज असते. येत्या काळात तीन ठिकाणचे मिळून ५१ टँकर लागणार आहेत. पुरंदर परिसरात सध्या १० हजार लिटर टँकर चा भाव १६०० रुपये आहे. सर्व विचार करता यासाठी आपल्या महत्वपूर्ण छोट्या मोठ्या मदतीची खूप आवश्यकता आहे. हा ग्रुप राहुल घोलप व त्यांचे सहकारी चालवत आहेत. ==========================
दिघी टेकडीवर टॅँकरने पाणी दिघी या ठिकाणच्या टेकडीवर अविरत श्रमदान या संस्थेतर्फे तीन हजार रोपे लावली आहेत. हा परिसर लष्कराच्या अधिपत्याखाली येत असल्याने तिथे परवानगी घेऊन ही रोपे लावली आहेत. तसेच या रोपांना टॅँकरने पाणी देण्यासाठी देखील लष्कराची परवानगी घ्यावी लागली. पायथ्याला टॅँकरने पाणी आणले जाते. त्या ठिकाणी एक टाकी बनविण्यात आली आहे. तिथे हे पाणी टाकून तेथून पर्यावरणप्रेमी कॅँडमध्ये पाणी घेऊन झाडांना देत आहेत. दहा ते पंधरा जणांचा हा ग्रुप असून, अनेक नागरिक त्यात सहभागी होत आहेत. वृक्षमित्र असे फेसबुक पेजही तयार केले आहे. त्याद्वारे वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला जातो, अशी माहिती अविरत श्रमदानचे जितेंद्र माळी यांनी दिली. ते म्हणाले, दर तीन दिवसांनी आम्ही झाडांना पाणी देत आहोत. सध्या उन्हाळा असल्याने अधिक काळजी घ्यावी लागते.
===========================