पांडुरंग मरगजे लोकमत न्यूज नेटवर्क धनकवडी : पुणे महानगरपालिकेच्या तळजाई टेकडीवर फेरफटका मारणाऱ्या नागरिकांची संख्या तशी बरीच आहे. उद्यानातील शेकडो देशी वृक्षांची निगा राखण्याचे वन विभाग व पालिकेला विसर पडू लागल्याने शेकडो वृक्ष वाळून त्यांचा ऱ्हास होऊ लागल्याने निसर्गप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. दक्षिण पुणे उपनगर परिसराला मोकळा श्वास व आॅक्सिजन देणाऱ्या बरीच झाडी नष्ट होत चालली असून लाखो रुपये अनुदान मिळत असतानाही या वृक्षसंपदेचे जतन केले जात नसल्याने नागरिकांमध्ये वनविभाग व पालिका प्रशासन याबाबतीत नाराजी निर्माण होत आहे. जवळपास साडेसहाशे एकर परिसरात विस्तार असलेल्या पाचगावपर्वतीचा हा परिसर एक प्रकारे दक्षिण पुण्याचे निसर्ग संपदेचा एक बहुमोल ठेवाच आहे.महापालिका वनविभाग व सामाजिक संस्थांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली आहे. महापालिका बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूदही केली जाते. अनेक सामाजिक संस्था व संघटना देखील स्वनिधीतुन वृक्षारोपण करत असताना या झाडांची देखभाल करण्यासाठी मात्र वनविभाग व पालिका उद्यान विभागाची उदासीनता दिसुन येते. जवळपास साडेसहाशे एकर क्षेत्रापैकी वनविभागाकडे तीनशे एकर क्षेत्र आहे. बाकीचे महापालिकेच्या उद्यान विभागाकडे आहे. वृक्षारोपण केल्यानंतर खऱ्या अर्थाने देखभाल करायला हवी ती केली जात नसल्याने महापालिकेच्या १०८ एकरातील वन उद्यान (आॅक्सिजन पार्क) मधील शेकडो झाडे पाण्याअभावी अखेरची घटका मोजत आहेत. यातील आंबा, वड, पिंपळ, जांभूळ, यासारखे पूर्ण वाढ झालेली व जैववैविध्यातेला बळकट करू करणारी शेकडो झाडे वाळून चाली आहेत. निसर्ग प्रेमी व विविध सामाजिक संस्था व संघटनांनी स्वखर्चाने लावलेल्या झाडांना तर कोणी वालीच राहिलेला दिसत नाही या झाडांची खुपच दुरावस्था झाली आहे. तळजाई टेकडीचे वैभव ठरणारी वृक्षसंपदा नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. वन विभाग व पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वनसंपदेचा हा ठेवाच नष्ट होत असल्यामुळे निसर्गप्रेमी चिंता व्यक्त करत आहेत.
तळजाई वनउद्यानातील झाडे मोजताहेत अखेरची घटिका : पालिका व वनविभागाचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 13:27 IST
महापालिकेच्या १०८ एकरातील वन उद्यान ( आॅक्सिजन पार्क ) मधील शेकडो झाडे पाण्याअभावी अखेरची घटका मोजत आहेत.
तळजाई वनउद्यानातील झाडे मोजताहेत अखेरची घटिका : पालिका व वनविभागाचे दुर्लक्ष
ठळक मुद्देमहापालिका वनविभाग व सामाजिक संस्थांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड मोठ्या प्रमाणावर महापालिका बजेटमध्ये आर्थिक तरतूद तळजाई टेकडीचे वैभव ठरणारी वृक्षसंपदा नष्ट होण्याची भीती निर्माण