पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांवर नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्टला (नीट) अचानक सामोरे जाण्याची वेळ आली आहे. सीईटी परीक्षा दिल्यानंतर पुन्हा नीट परीक्षा द्यावी लागत असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्रसंतापाची लाट आहे. त्यामुळेच विद्यार्थी व पालकांमधील उद्रेकाला वाट करून देण्यासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला आहे. पुण्यातील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व सीईटी परीक्षेतील जाणकारांच्या सहभागातून नीटच्या प्रश्नाला कसे सामोरे जायचे, या विषयावर विद्यार्थी व पालकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १८ मे रोजी रोजी सायंकाळी ४.३० वाजता शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात हा मेळावा घेतला जाईल.शिक्षणतज्ज्ञ, पालक, विद्यार्थी यांच्या सूचना केंद्र व राज्य शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकमत’तर्फे या मेळाव्याच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे या मेळाव्याचे निमंत्रक आहेत. तसेच डिस्ट्रिक्ट एन्ट्रन्स एक्झामिनेशन परफॉर्मन्स इनहॅन्समेंट अॅण्ड रिसर्चचे (डीपर) संस्थापक - सचिव हरिश बुटले, दी आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक दुर्गेश मंगेशकर यांच्या सहकार्याने हा मेळावा घेतला जात आहे. पुण्यातील लोकप्रतिनिधींसह शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींना मेळाव्यासाठी निमंत्रित केले जात आहे. नीट व सीईटीच्या गोंधळामुळे संभ्रमावस्थेत असलेल्या विद्यार्थी व पालकांना या मेळाव्यात सहभागी होता येईल.मेडिकलच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांना पुन्हा नीट परीक्षा द्यावी लागणे, हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे केंद्र शासनाने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून यंदा मेडिकलचे प्रवेश सीईटीनुसार देण्याबाबत अध्यादेश काढणे आवश्यक आहे. राज्य शासनाने व राज्यातील खासदारांनी केंद्रावर यासंदर्भात दबाव आणण्याची गरज आहे. लोकांच्या तीव्रभावना सरकारपर्यंत पोहोचवून नीट परीक्षा रद्द करण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून केला जाईल. तसेच नीट परीक्षा रद्द करण्याबाबत सरकार अयपशी ठरले तर विद्यार्थ्यांनी दोन महिन्यात कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा, कोणत्या प्रश्नपत्रिकांचा सराव करावा, याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. नीट परीक्षेला कोणाचाही विरोध नाही. परंतु, विद्यार्थ्यांना अचानक परीक्षा देण्यास सांगणे संयुक्तिक नाही. त्यामुळे यंदा नीट परीक्षा रद्द करावी, अशी भूमिका मेळाव्यात मांडली जाणार आहे.>हा मेळावा येत्या १८ मे रोजी सायंकाळी ४़३० वाजता शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात होणार आहे़