पुणे : गुन्हे शाखेच्या युनिट ६ मधील पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे आणि ऋषिकेश टिळेकर यांच्या प्रयत्नांनी भर रस्त्यात जबरी चोरी करुन साडेतेरा लाख रुपयांची रोकड चोरुन नेणार्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
लोणीकंद येथे भररस्त्यात साडे तेरा लाखांची बॅग चोरुन नेणार्या सराईत गुन्हेगार इशाप्पा पंदी याने केल्याची व तो केसनंद फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे व ऋषिकेश व्यवहारे यांनी मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय १९, रा. यशवंतनगर, वाघोली) याला पकडले. त्याच्या मदतीने त्याचा साथीदार प्रदीप ऊर्फ बाबु यशवंत कोंढाळकर (वय २३, रा. केसनंद) याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते ओंकार गुंजाळ, विजय राठोड व गणेश काळे या साथीदारांच्या मदतीने गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. ते गुन्हा केल्यानंतर त्यांच्याकडील सीमकार्ड बदलून नवीन सीमकार्ड घेत असत. ऋषिकेश टिळेकर यांनी आरोपी वापरत असलेल्या नवीन सिमकार्डबाबतची माहिती मिळवली. तसेच ते तिघे दुसरा गुन्हा करण्याची योजना करण्यासाठी केसनंद येथे येणार असल्याची माहिती मिळविली. या माहितीवरुन पोलिसांनी ओंकार शंकर गुंजाळ (वय २४, रा. लोणीकंद), गणेश रामदास काळे (वय ३२, रा. वाघोली) आणि विजय नंदू राठोड (वय २२, रा. वाघोली) यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, दुचाकी तसेच मोबाईल फोन जप्त केले. चोरी केलेल्या पैशांमधून त्यांनी कपडे, फ्रिज, शेगडी, मोबाईल, ब्ल्युटुथ हेडफोन खरेदी केले होते. तो सर्व माल पोलिसांनी जप्त केला. इशाप्पा पंदी व ओंकार गुंजाळ यांच्याविरुद्ध अहमदनगरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
पोलीस निरीक्षक गणेश माने यांच मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील हे अधिक तपास करीत आहेत.