नाताळ, नववर्षानिमित्त मागणी : फोटो, स्वरचित कविता, संदेश आदींचे प्रिटिंग, पेंटिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नवीन वर्षाचे स्वागत असो किंवा नाताळाचे उत्सवी वातावरण, आपल्या प्रियजनांना गिफ्ट देण्याचा हा सर्वोत्तम काळ असतो. एखादा आनंदाचा प्रसंग अधोरेखित करण्यासाठी भेटवस्तू द्यायची असते. भेटवस्तूच्या आठवणी निरंतर टिकाव्यात म्हणून आजकाल भेटवस्तूंना ‘पर्सनल टच’ देण्याचा ट्रेंड प्रचलित झाला आहे. टीशर्ट, डायरी, मग, अंगठी, कीचेनपासून अगदी पत्त्यांचे कॅट, लहान मुलांच्या ड्रॉईंग बूकपर्यंत अनेक वस्तूंना कमालीची पसंती मिळत आहे.
भेटवस्तू म्हणजे केवळ वस्तूंची देवाणघेवाण नसते. प्रेम, जिव्हाळा, काळजी, शुभेच्छा अशा सगळ्या भावनांचे ते प्रतीक असते. माणूस स्वत:वर सर्वाधिक प्रेम करतो. त्यामुळे स्वत:चा फोटो, आपली आवड अधोरेखित करणारे गिफ्ट असेल तर ती जास्त भावते, आपलीशी वाटते, जपून ठेवली जाते. त्यामुळेच पर्सनलाईज्ड भेटवस्तूंकडे वाढता कल पहायला मिळत आहे. शहरात जंगली महाराज रस्ता, कॅम्प, फर्ग्युसन रस्ता अशा ठिकाणी पर्सनलाईज्ड वस्तू तयार करुन देणारी खास दुकानेही थाटण्यात आली आहेत. याशिवाय, आॅनलाईन माध्यमातूनही भेटवस्तू तयार करुन घेता येतात. यामध्ये फोटो किंवा नाव प्रिंट केले जाते किंवा हँड पेंटिंगही केले जाते.
अंगठ्या, किचेन यांना पर्सनल टच द्यायचा असेल तर आवडीची रंगसंगती, फोटो किंवा नावाचे इनिशियल्स वापरले जातात. अंगठ्या, किचेन यांची किंमत १०० ते ५०० रुपयांच्या दरम्यान असते. डायरी तयार करताना आवडीचे कोटस अथवा स्वरचित कविता, काही आठवणी यांचा समावेश केला जातो. डायरीची किंमत ८००-१५०० रुपयांदरम्यान असते.
--------------------------
मी गेल्या २० वर्षांपासून या व्यवसायात आहे. ग्राफिक डिझायनिंगचे काम सुरु असताना लोक स्वत:चा फोटो वस्तूंवर प्रिंट करुन मिळेल का, अशी विचारणा करायचे. त्यामुळे पर्सनलाईज्ड डायरी बनवायला सुरुवात केली. यामध्ये कव्हर पेजवर फोटो, तसेच फोटोंचे कोलाजही करुन दिले जाते. पर्सनलाईज्ड बॉक्स, मग, पत्त्यांचे कॅट, लहान मुलांसाठी पर्सनलाईज्ड चित्रकलेची वही, पेन, रंग असे वैविध्य आहे.
- अनिल कुलथे, आर्टिस्ट