पुणे : प्राथमिक शाळांमधील शिक्षक पदाची पात्रता असलेल्या डीएड (डीटीएड) अभ्यासक्रम प्रवेशाच्या शेवटची फेरी संपत आली तरी अद्याप केवळ १० हजार ३०६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत, त्यामुळे राज्यभरातून यंदा ४५ हजार ३३८ जागा रिक्त राहणार आहेत. शासनाने शिक्षक भरती बंद करून डीएड पदविकाधारकांबाबत दाखवलेल्या प्रचंड उदासीनतेमुळे विद्यार्थी डीएडऐवजी इतर अभ्यासक्रमांकडे वळू लागले आहेत.बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ८४७ डी.एड. महाविद्यालयांच्या ५५ हजार ६४४ जागांसाठी आॅनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. शेवटची फेरी येत्या ३१ जुलै रोजी संपत आहे. आतापर्यंत केवळ १० हजार ३०६ विद्यार्थ्यांनी डिएड अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला. शासकीय अनुदानित असलेल्या २५ हजार तर एकूण ४५ हजार ३३८ जागा रिक्त राहत आहे.सहा-सात वर्षांपूर्वी बारावी चांगले मार्क मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिली पसंती ही डिएड अभ्यासक्रमास असायची, त्यामुळे डिएडला प्रवेश मिळणे मोठे जिकिरीचे ठरत होते. दरम्यानच्या काळात मोठया प्रमाणात डिएड कॉलेजला मान्यता देण्यात आल्या. त्याचबरोबर शिक्षकांची नोकरी भरतीच बंद करून टाकली. परिणामी अनेक डिएड कॉलेज बंद पडत असून प्रवेशाच्या हजारो जागा रिक्त राहू लागल्या आहेत.शासनाने सन २०१२ शिक्षक भरतीवर बंदी घातली आहे, त्यामुळे गेल्या ६ वर्षांपासून डिएड करून बाहेर पडलेले लाखो पदविकाधारक बेरोजगार आहेत. त्याचबरोबर प्राथमिकला शिक्षक म्हणून नोकरी करायची असेल तर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. या परीक्षेची काठिण्यपातळी अधिक ठेवण्यात आल्याने अनेकजण ती उत्तीर्ण होऊ शकलेले नाहीत. त्याचबरोबर आता गुणवत्तेच्या आधारावर नोकरी देणार असे स्पष्ट करून राज्यभरातील डिएड उमेवादारांची आणखी एक शिक्षक अभियोग्यता परीक्षा शासनाकडून घेण्यात आली आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारावर नोकरी दिली जाईल असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र या परीक्षेचा निकाल लागून अनेक महिने उलटले तरी अद्याप शासनाने शिक्षक भरती सुरू केलेली नाही. त्यामुळे डिएड झाल्यानंतर टीईटी उत्तीर्ण होणे, त्यानंतर अभियोग्यता चाचणीच्या तीव्र स्पर्धेला सामोरे जाणे. हे दिव्य पार पाडल्यानंतर ३ वर्षे तुटपुंज्या पगारावर शिक्षण सेवक म्हणून काम करणे शिक्षकांना भाग आहे. त्यामुळे शिक्षकी पेशाकडे वळण्यास विद्यार्थी नकार देऊ लागले आहेत.शिक्षकी भरती केव्हा?राज्य शासनाकडून २०१२ पासून शिक्षक भरती बंद करण्यात आलेली आहे. त्याचे दूरगामी परिणाम शिक्षकी वर्तुळात होत आहेत.जून २०१८ मध्ये शिक्षक भरतीवरील बंदी उठविली जाईल असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले होते. मात्र जुलै महिना उलटला तरी अद्याप शिक्षक भरतीवरील बंदी उठविण्यात आली नाही. त्यामुळे डिएड व बीएड पदवीधारक विद्यार्थ्यांमध्ये मोठयाप्रमाणात नाराजीची भावना आहे.१०३ कॉलेज बंद अन् साडेचार हजार जागा कमीमागील वर्षी डीएडच्या ९४९ कॉलेजमध्ये ६० हजार जागा उपलब्ध होत्या. विद्यार्थ्यांनी डीएडच्या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवल्याने १०२ डीएड कॉलेज बंद पडले असून ४ हजार ३५६ जागा कमी झाल्या आहेत. तरीही यंदा मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या आहेत.
शिक्षकी पेशाकडे विद्यार्थ्यांचा कल कमीच; ४५ हजार जागा राहणार रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 3:10 AM