पुणे : सध्याचा जमाना सोशल मिडियाचा आहे. लोकगीतांनाही सोशल मिडियाने तारले आहे. पूर्वी गाणे गणेशोत्सव, दहीहंडीमध्ये वाजले की सुपरहिट व्हायचे. आताच्या गाण्यांचा ट्रेंड टिक टॉकवरुन ठरतो. एखादे गाणे टिक टॉकसाठी सातत्याने वापरले गेल्यास ते सर्वत्र लोकप्रिय होते, असे मत लोकगीत गायकांनी व्यक्त केले.मानसिक शांती मिळवण्याचा, आनंदी राहण्याचा रामबाण उपाय म्हणजे संगीत. अनेक गाण्यांवर आपण ठेका धरतो, उडत्या चालीच्या गाण्यांवर आपली पावले थिरकतात. परंतु, या गायकांचे चेहरे आपल्या कधीच समोर आलेले नसतात. लोकगीते रचणारे गायक, संगीतकार यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने जागतिक संगीत दिनानिमित्त संवाद साधला. ‘सुया घे, पोत घे’, ‘आला बाबुराव’, ‘खिशात असंल मनी, तर मागं लागतील सतरा जणी, ‘ओ माय गॉड, मला लागलं तुझं याड’ अशी गाणी त्यांनी गायली.प्रदीप कांबळे म्हणाले, ‘लोकगीतांना गेल्या काही काळात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जागतिकीकरणाचे वारे वाहत असले तरी सामान्यांचे मातीशी असलेली नाळ अधिकाधिक घट्ट होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील, बोलीभाषेतील शब्द लोकांना आपलेसे वाटतात. त्यामुळे ही गाणी अल्पावधीत लोकप्रिय होतात.’सचिन अवघडे म्हणाले, ‘इतर गायकांच्या तुलनेत बरेचदा आमच्यासारखे कलाकार प्रसिध्दीपासून दूर राहतात. मात्र, एकदा गाणी हिट झाली की चांगले कार्यक्रमही मिळतात. त्यातून समाधानकारक उत्पन्न मिळते.’राखी चौरे म्हणाल्या, ‘लोकगीतांमध्ये मुलींची संख्या नक्कीच कमी आहे. मात्र, आपला आवाजही लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे वाटले. तुझ्या खिशात असंल मनी, तर मागं लागतील सतरा जणी’ या गाण्याचे तुफान लोकप्रियता मिळवून दिली. मला लहानपणापासून गवळणीसारखे प्रकार ऐकायला आवडतात. गाण्यांचे जुने प्रकारही नव्या पिढीपर्यंत पोचले पाहिजेत.’रोमिओ कांबळे म्हणाले, ‘शासनाने लोककलावंतांची दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे. लोककलावंतांनी आपली संस्कृती, परंपरा ख-या अर्थाने जपली आहे. त्यामुळे कलेबाबतची सरकारची उदासिनता दूर होणे आवश्यक आहे.’
आताच्या गाण्यांचा ट्रेंड टिक टॉकवरुन ठरतो : लोकगीत गायकांनी व्यक्त केले मत (व्हिडीओ)
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 20:10 IST