डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. सुरू असलेल्या पावसामुळे भातरोपांना जीवदान मिळाले आहे. रोहिणी नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने या भागातील भातपेरण्यांना काहीसा उशीर झाला होता. परंतु सुरू असलेल्या पावसामुळे आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील भातशिवारांत रोपे तरारू लागली आहेत. भातशेतीच्या मशागतीची कामेही अंतिम टप्प्यात असून पावसाने अशीच साथ दिल्यास पुढील आठ दिवसांत तालुक्याच्या आदिवासी भागात भातलागवडीची धामधूम सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळणार आहे.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच जोरदार सुरुवात केली आहे. रोहिणी नक्षत्राच्या सुरूवातीच्या काळपत पावसाने काहीशी ओढ दिली होती. यामुळे शेतकरीवर्ग भातपेरणीसाठी पावसाचा अंदाज घेत असल्याचे चित्र होते. मात्र पावसाला सुरूवात होताच शेतकऱ्यांनी यंदा वेळेत भातपेरण्या उरकून घेतल्या. सुरुवातीला हुलकावणी देणाऱ्या पावसाने नंतरच्या काळात मात्र उत्तम हजेरी लावली आहे. सध्या भातरोपांच्या वाढीसाठी चांगला पाऊस होत असून, अधूनमधून उघडीपही मिळत असल्याने शेतकरीवर्ग भातखाचरांच्या मशागती करण्यात गुंतला आहे. मशागतीची कामेही सध्या अंतिम टप्प्यात आहेत.
सध्याही या भागात पावसाची हजेरी कायम आहे. सुरू असलेला हा पाऊस भातरोपांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. या पावसामुळे भातरोपांची वाढ उत्तम होत आहे. सध्या तालुक्याच्या आदिवासी भागात भातरोपांचे वाफे सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, सर्वत्र भातरोपे तरारू लागली आहे. भात शिवारं लागवडीसाठी सज्ज होत असून, मशागतीबरोबरच पावसाने अशीच साथ दिल्यास पुढील आठवडेभरात सर्वत्र भातलागवडीची कामे सुरू झाल्याचे चित्र आपणास पाहावयास मिळणार आहे.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात भातरोपे तरारू लागली असून, भातशेतीच्या मशागतीची कामेही अंतिम टप्प्यात आहेत. (छायाचित्र-कांताराम भवारी.)