डिंभे : गारपीट व जोरदार पावसाच्या माऱ्यामुळे हिरड्याचा बार झडल्याने हिरड्याच्या उत्पादनात घट होणार आहे. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरुवातीला भातपीक वाया गेले. आता हिरड्याला अवकाळीचा फटका बसल्याने धान्यही नाही आणि पैसाही नाही, अशी स्थिती आदिवासी शेतकऱ्यांची झाली आहे. वारंवार मागणी करूनही हिरड्याच्या झाडांच्या नोंदी आदिवासी शेतकऱ्यांच्या सातबारावर झाल्या नाहीत. यामुळे नुकसान होऊनही यंदा आदिवासी शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. आंबेगाव तालुक्याबरोबरच जुन्नर व खेड तालुक्यांतील पश्चिम भागात दरवर्षी आदिवासी शेतकऱ्यांकडून मोठया प्रमाणात हिरडा गोळा केला जातो. भातशेती हे या भागातील प्रमुख पीक असून हिरड्याचे उत्पादन हे या भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या अर्थार्जनाचे एकमेव साधन आहे. मार्च-एप्रिलच्या दरम्यान हिरड्याची झाडे बार धरण्यास सुरूवात करतात. तर मे महिन्यामध्ये या भागात हिरडा गोळा करण्याचा हंगाम सुरू असतो. दरवर्षी या भागातील आदिवासी शेतकऱ्यांकडून हजारो क्विंटल हिरडा गोळा केला जातो. हा गोळा केलेला हिरडा आदिवासी महामंडळ व खाजगी व्यापा-यांना विकून मिळणाऱ्या पैशावर आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवीत असतात. हिरडा उत्पादनातून दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल होत असते. आंबेगाव तालुक्यास जुन्नर व खेड तालुक्याच्या पश्चिम भागात एप्रिल महिन्यामध्ये अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी गारपीट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे नुकतीच बार धरू लागलेल्या हिरड्याच्या झाडांचे नुकसान झाले. झाडांना लगडलेला बार गळून खाली पडल्याने यंदा या परिसरात केवळ कोवळ्या पानांनी लगडलेली हिरड्याची झाडे पाहावयास मिळत आहेत. या भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात कमीत कमी २० ते २५ हिरड्यांची झाडे असतात. काही शेतकऱ्यांच्या शेतात तर पिढ्यान्पिढ्या राखून ठेवलेली हिरड्यांची झाडे आहेत. हिरड्याच्या एका मोठ्या झाडापासून १ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. ६० रुपये प्रतिकिलोप्रमाणे हिशोब केल्यास हंगामात एका झाडापासून आदिवासी शेतकऱ्यांना सहा हजारापर्यंतचे उत्पन्न मिळते. सातबाराव नोंदीच नसल्याने नुकसानीचे पंचानमे कसे करावयाचे असा प्रश्न उपस्थित करून आदिवासी शेतकऱ्यांना हिरड्याच्या नुकसान भरपायीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. सुरूवातीला अवकाळी पावसाने भातशेतीचे नुकसान केले. आता हिरड्याच्याही उत्पन्नावर घाला पडल्याने शेतकरी पुरता रिकामा झाला असून धान्यही नाही. (वार्ताहर)
आदिवासी शेतकरी संकटात
By admin | Published: April 20, 2015 4:22 AM