नेरे : तीन दिवसांपूर्वी गुंजवणी नदी पात्रात मासेमारीसाठी गेलेल्या कासुर्डी (ता.भोर) येथील आदिवासी युवकाचा मृतदेह आढळून आला.विलास परशुराम मोरे (वय ४२) असे त्याचे नाव आहे. मोरे तीन सहकाऱ्यांसह मासेमारीसाठी गेले होते. गुंजवणी धरणातून नदी पात्रात अचानक कोणतीही कल्पना न देता जलसंपदा विभागाने अधिक क्षमतेने पाणी सोडल्याने मोरे वाहून गेले होते. अन्य तीन युवक कसेबसे बाहेर निघाले होते. त्यांचा मृतदेह मंगळवार (दि. १३) रोजी आढळून आला. हि घटना घडून तीन दिवस झाले तरी जलसंपदा विभागाचे अधिकारी फिरकले नसल्याने तसेच या घटनेला संबंधित विभाग कारणीभूत असल्यांने संतप्त नातेवाईकांनी मृतदेह नीरा देवघर धरण कार्यालयासमोर ठेवून या घटनेचा निषेध केला.
मोरे यांच्या मृत्यूस कारणीभूत जलसंपदा विभाग आहे. त्यामुळे याच्या मृतदेहास अग्नी हा नीरा देवघर कार्यालयासमोरच केले जाईल असा संतप्त भावना नातेवाईकांनी व्यक्त करून सदरचा मृत्यूदेह जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर आणून ठेवला. या घटनेची माहिती मिळताच माजी उपसभापती लहूनाना शेलार यांनी सकाळपासूनच वरिष्ठ अधिकाºयांना दूरध्वनी करूनही एकही अधिकारी हजर झाले नाहीत .त्यामुळे अधिकच नातेवाईकांच्या संतप्त भावना झाल्या.चार तास मृतदेह कार्यालयासमोर ठेवूनही कोणाकडूनच काही मार्ग निघेना म्हणून दुपारनंतर लहूनाना शेलार व स्थानिक पत्रकारांनी कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांना संपर्क केला असता, मी पुण्यामध्ये आहे; मी येतो असा निरोप दिला. तोपर्यंत चार तास मृतदेह कार्यालयासमोर ठेवण्यात आला होता. कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांना दोन दिवस संपर्क करूनही त्यांनी व इतर अधिकाºयांनी या घटनेचे गांभीर्य घेतले नाही. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळत गेले. पोलिसांच्या मदतीने व माजी उपसभापती लहूनाना शेलार, गणेश मालुसरे यांच्या मध्यस्थीने अखेर यावर तोडगा निघाला. मदतीचे आश्वासन मिळाल्यावर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.