डिंभे: आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या दुधात आळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या दुधाच्या टेट्रा बॉक्समध्ये आळ्या सापडल्याने पालक व विद्यार्थी वर्गामध्ये एकच खळबळ उडाली आहे. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील न्यु इंग्लिश स्कूल शासकिय आश्रम शाळेत हा प्रकार उघडकीस आला आहे. प्रकल्प कार्यालय अवघ्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या स्कूलमध्ये आळ्या सापडल्याने घोडेगाव प्रकल्प कार्यालयाच्या कारभार बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव प्रकल्पांतर्गत येणाऱ्या जुन्नर, आंबेगाव व खेड या तालुक्यातील सुमारे १६ आदिवासी आश्रम शाळात शिकणाऱ्या मुलांना शासनामार्फत भोजन व दुधाचा पुरवठा केला जातो. मागील महिन्यात पुरविण्यात येणाऱ्या भोजनामध्ये आळ्या सापडल्याचे प्रकरण ताजे असतानाच आज या आश्रम शाळांना पुरवण्यात आलेल्या दुधाच्या टेट्रापॅक मध्ये आळ्या सापडून आल्याचा प्रकार समोर आला आहे. घडलेला हा प्रकार घोडेगाव ( ता. आंबेगाव) येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये घडला आहे.
या घटनेची माहिती मिळताच बिरसा ब्रिगेड व एसएफआय या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आश्रम शाळेत भेट देत येथील मुख्याध्यापक व अधिक्षक यांच्या बरोबर दुधाच्या बॉक्सची पाहणी केली असता ठेकेदारांमार्फत पुरविल्या आलेल्या गोवर्धन कंपनीच्या दुधाच्या ट्रेट्रापॅकमध्ये मोठ्या प्रमाणात अळ्या आढळून आल्याचे निदर्शनास आल्या असून याबाबत या दोन्ही संघटनांनी तातडीने घोडेगाव प्रकल्प अधिकारी यांची भेट घेत या प्रकरणी दोषींवर कठोर करवाई करण्या बाबत चे निवेदन देण्यात आले आहे.