डेहणे : टोकावडे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गळक्या इमारतीत शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. निधीअभावी नवीन काम अर्धवट असल्याने जुन्या धोकादायक इमारतीत मुलांना बसावे लागत आहे. येथे आदिवासी विभागाची आश्रमशाळा आहे. सध्या शाळेत ३७२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वसतिगृहात १३० मुली व १०४ मुले आहेत. ३० ते ३५ वर्षे जुन्या इमारतीत असलेल्या या शाळेत ही मुले जीव मुठीत घेऊन शिकत आहेत. शासनाच्या आदिवासी विकास विभागाने टोकावडे येथे २०१२ मध्ये शाळा, मुलांचे व मुलींचे वसतिगृह असे ६ कोटी रुपयांची नवीन इमारत मंजूर केली. या तिन्ही इमारती आज अर्धवट बांधकाम केलेल्या अवस्थेत आहेत. सन २०१२ मध्ये सौरभ कन्स्ट्रक्शन (पुणे) यांनी बांधकाम सुरू केले. सन २०१५ पर्यंत शाळा व मुला-मुलींचे वसतिगृह असे तिन्ही इमारतींच्या भिंती व स्लॅब टाकून अपूर्ण अवस्थेत सोडून दिल्या आहेत. दरवाजे, खिडक्या, लाइटफिटिंग व रंग एवढ्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला नाही, म्हणून पुढील काम गेल्या एक वर्षापासून रखडले आहे. वाढीव दराने शिल्लक रक्कम मंजूर केल्यानंतरच काम करू, असा पवित्रा ठेकेदाराने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व आदिवासी विकास विभागाने यासाठीचा आवश्यक निधी उपलब्ध करून आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल थांबवावेत, अशी मागणी पालकांकडून व्यक्त केली जात आहे. या आश्रमशाळेला पंचायत राज समिती सदस्यांनी भेट दिली होती. त्यावेळीही हा प्रकार त्यांच्याकडे मांडण्यात आला होता. याबाबत प्रकल्प अधिकारी सोनकवडे यांनी सांगितले की, ‘इमारतीच्या तिन्ही बाबींची मूळ रक्कम व वाढीव रक्कम यात मोठी तफावत आहे. त्यामुळे प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्व माहिती आहे.’ (वार्ताहर)प्रकल्प अधिकारी घोडेगाव यांना वेळोवेळी पाठपुरावा केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चुकीच्या इस्टीमेटमुळे निधी कमी पडला. त्वरित काम सुरू न झाल्यास सरपंच संघटना आदिवासी विकास मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे.- विठ्ठल वनघरे, अध्यक्ष, सरपंच संघटना
गळक्या इमारतीत शिकताहेत आदिवासी विद्यार्थी
By admin | Published: August 19, 2016 5:52 AM