घोडेगाव : काळेवाडी (पिंपरी) येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पूर्वसूचना न देता, अचानक केशवनगर (पुणे) येथे हलविण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतल्यामुळे आदीवासी विद्यार्थी संतप्त झाले आहेत. ६५ विद्यार्थ्यांनी घोडेगाव येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या दालनात ३ नोव्हेंबरपासून पासून ‘धरणे आंदोलन’ सुरू केले आहे. या कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी टी. एम. पिचड यांनी अजूनही कोणतीही दखल घेतली नसून, दि. ५ रोजी सकाळपर्यंत प्रकल्प अधिकारी यांनी सकारात्मक चर्चा केली नाही, तर प्रकल्प कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचे स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडियाच्या सदस्य विद्यार्थ्यांनी लेखी निवेदनाद्वारे सांगितले आहे. पुणे शहरात आदिवासी मुलांसाठी मांजरी, शेवाळवाडी, येवलेवाडी, हडपसर, कोरेगाव पार्क व काळेवाडी फाटा या सहा ठिकाणी वसतिगृह आहेत. यातील काळेवाडी, पुणे हे वसतिगृह मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे विद्यार्थ्यांना सोयीस्कर आहे; परंतु हे वसतिगृह प्रकल्प कार्यालयाने केशवनगर येथे हलविण्याचा निर्णय घेतला. काळेवाडीचे वसतिगृह पुण्याच्या बाहेर केशवनगर येथे नेऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयाशी अनेकवेळा पत्रव्यवहार करून संपर्क साधला; परंतु त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.या वसतिगृह जागामालकाने पाणी व जेवण बंद केले, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होऊ लागले. येथे १४५ विद्यार्थी राहतात. यातील अनेक विद्यार्थ्यांची सध्या परीक्षा सुरू आहे. तसेच, पहिले शैक्षणिक सत्र संपले नसतानाही अधेमधेच जागा बदलण्याचा प्रकल्प कार्यालयाने घातलेला घाट अतिशय अन्यायकारक आहे. काळेवाडी परिसरातच जागा विद्यार्थ्यांना सोयीस्कर असून, येथे जागा मिळेपर्यंत हे वसतिगृह हलवू नये, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. प्रकल्प अधिकरी टी. एम. पिचड अथवा कोणताही अधिकारी त्यांच्याशी चर्चेला आला नाही, त्यामुळे हे विद्यार्थी प्रकल्प अधिकाऱ्याच्या दालनातच बसून आहेत. दोन रात्र विद्यार्थी प्रकल्प अधिकाऱ्याच्या दालनातच झोपले. तसेच, एसएफआय संघटनेचे गणपत घोडे, सोमनाथ निर्मळ आदी विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्याच्या पुतळ्याचे दहन करून घोषणाबाजी केली. दरम्यान, दोन दिवसांत अनेक संघटना व विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेतली. (वार्ताहर)
आदिवासी विद्यार्थ्यांचा घोडेगावात तीन दिवसांपासून ‘ठिय्या’
By admin | Published: November 05, 2014 5:41 AM