पुणे : हाडाचा शिक्षक, लोककलावंत, बालनाट्य लेखक असे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असलेले ज्योतिराम कदम हे कलावंत शिक्षक होते, अशा शब्दांत अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे यांनी श्रद्धांजली वाहिली.
बालचित्रवाणीचे माजी कार्यक्रम निर्माता, लेखक, दिग्दर्शक ज्योतिराव कदम यांचे नुकतेच निधन झाले. अमरेन्द्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे ते आजीव सदस्य होते. संस्थेच्यावतीने ऑनलाइन श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सहकार्यवाह सुनील महाजन म्हणाले, कदम यांचा पेहराव म्हणजे सलवार, नेहरू सदरा, खांद्याला शबनम असा असे. शबनममध्ये कायम त्यांनी लिहिलेली बालसाहित्याची पुस्तके असत. ते सर्वांनाच पुस्तके भेट देत असत.
कोषाध्यक्ष डॉ. दिलीप गरुड म्हणाले, निगर्वी, शालीन असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. ते लोककलावंत होते. त्यांचा आवाज मधुर होता. कार्यक्रम सादर करताना ते मुलांना खिळवून ठेवत असत.
प्रीती शेटे, योगेश केळापुरे, बिपीनचंद्र चौगुले, निर्मला सारडा आदींनी श्रद्धांजली वाहिली.