पुणे : मध्यप्रदेश सरकारच्या माहिती सांस्कृतिक विभागानं परमप्रतापी बाजीराव पेशव्यांवर एक विशेष चित्रफित तयार करून त्यांना स्मरण जागते ठेवलं आहे. बाजीरावांनी चिरविश्रांती घेतली त्या मध्यप्रदेशातीलच रावेरखेडी या नर्मदातिरी असणाऱ्या गावात त्यांचे १०० कोटी रूपयांचं स्मारकही उभारण्यास सुरूवात केली आहे.
राजा छत्रसालच्या विनंतीवरून बाजीराव बुंदेलखंडाच्या मदतीसाठी धावून गेले. त्यानंतर त्यांनी धडक मारली ती थेट दिल्लीलाच. तिथेही दैदिप्यमान विजय मिळवून त्यांनी मुघल साम्राज्याची तोपर्यंत मजबूत असलेली वीट ढिली करून टाकली. एकूण ३ मिनिटांच्या या चित्रफितीमध्ये बाजीरावांच्या २० वर्षांच्या लढाऊ कारकिर्दीचा धावता आढावा घेण्यात आला आहे. त्याला जोड आहे ती अतिशय सुरेख अशा चित्रांची आणि बहारदार आवाजातील निवेदनाची. सुरेख निर्मिती असलेल्या या चित्रफितीत मध्यप्रदेश सरकारने अत्यंत आदरपूर्वक बाजीरावांचे स्मरण करत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
स्मारक १०० कोटींचे असून त्यातील २७ कोटींच्या कामाला सुरुवात
रावेरखेडी येथे सरकारच्या वतीने बाजीरावांचे स्मारक बांधले जात आहे. जयपूरच्या गुलाबी दगडांमध्ये बांधल्या जात असलेल्या या स्मारकाच्या रचनेत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी छोटीशी दुरूस्ती सुचवली. स्मारक मराठा स्थापत्यशैलीत,सह्याद्रीच्या काळ्या पाषाणात व शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजासहित असावे ही ती दुरूस्ती. मध्यप्रदेश सरकारचा मोठेपणा असा की तिथल्यातिथे ही दुरूस्ती मान्य केली. हे स्मारक १०० कोटी रूपयांचे असून त्यातील २७ कोटी रूपयांच्या कामाला सुरुवातही झाली आहे.