संजय मानेपिंपरी : वेगवेगळ्या क्लृप्त्यांचा अवलंब करून आॅनलाइन व्यवहार करण्यास भाग पाडले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना कोट्यवधींचा गंडा घालणारे भामट्यांचे रॅकेट कार्यरत आहे. त्यांच्या या हायटेक आॅनलाइन फसवणुकीच्या घटनांचे बळी ठरलेल्यांमध्ये सामान्य नागरिक, नोकरदार, व्यापारी, उद्योजक आणि तरुण वर्गाचा समावेश आहे. पोलीस आणि न्यायव्यवस्थेत काम करणारे कर्मचारीसुद्धा अशा फसवणुकीपासून अलिप्त राहू शकलेले नाहीत. या हायटेक फसवणुकींच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.उद्योगनगरीत तरुण व तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून आॅनलाइन रक्कम भरण्यास भाग पाडले जाते. तर कधी विवाह इच्छुकांची मॅट्रोमोनियल संकेत स्थळावरून माहिती मिळवून त्यांची लुबाडणूक केली जाते. परदेशी कंपन्यांकडून विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी डिलरशिप मिळवून देतो. असे सांगून लाखो रुपयांना गंडा घातल्याच्या घटना गेल्या सहा महिन्यांत शहरात वाढल्या आहेत.वडिलांच्या नावे भविष्यनिर्वाह पेन्शन फंडात असलेली रक्कम मिळण्यासाठी बँक खाते क्रमांक मागितला. वेळोवेळी आॅनलाइन व्यवहार करण्यास सांगून आरोपींनी फिर्यादीची ७ लाख ९० हजार ४७ रुपयांची फसवणूक केली असल्याची फिर्याद नुकतीच निगडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
‘स्किमर’ बसवून बँकांची फसवणूकछुपे कॅमेरे लावून चोरट्यांनी ग्राहकांचे गोपनीय पिन क्रमांक, बँक खात्याची अन्य माहिती मिळवून परस्पर त्यांच्या बँक खात्यातून रक्कम दुसऱ्या खात्यांमध्ये वर्ग केल्याचा प्रकार घडला होता. क्लोन कार्डद्वारे बंगळुरू आणि चेन्नई येथे असलेल्या ग्राहकांच्या बँक खात्यातील रकमेची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. हिंजवडी परिसरातील एटीएम केंद्रांमध्ये अशा प्रकारे बँकेच्या एटीएममधून डेटा चोरीचा हा प्रकार पोलीस तपासात निदर्शनास आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अशा प्रकारे किमान १० ते १५ बँकांच्या एटीएममध्ये ‘स्किमर’ बसवून डेटा चोरी करून कार्ड क्लोन तयार केले असण्याची शक्यता सायबर सेलच्या अधिकाºयांनी व्यक्त केली होती. गोपनीय पासवर्डचा वापर करून विविध बँकांच्या १७ एटीएममधून सुमारे एक कोटी ३५ लाख ३४ हजार ७०० रुपये रकमेचा अपहार केल्याचे उघड झाले होते. एटीएम केंद्रात सेवा पुरविणाºया कंपनीशी संबंधित कर्मचाºयांनी या रकमेचा अपहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
व्यापाऱ्यांची फसवणूक
भारतातील वनौषधी तेलाला परदेशात मोठी मागणी आहे. असे आमिष दाखवून आपण परदेशातील कंपनीशी मालाचा पुरवठा करण्याचा करार करून देऊ, असे आमिष दाखवून चिंचवड येथील एका व्यापाºयास मुंबई स्थित नायजेरियन टोळीने सुमारे दीड कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी शहरात घडला आहे. सायबर सेलने याप्रकरणी तपास करून दोन नायजेरियन भामट्यांना पनवेल येथून अटकसुद्धा केली. भारतातील एका महिलेच्या मदतीने हे टोळके आॅनलाइन फसवणूक करीत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. चिंचवडच्या व्यापाºयासह अन्य व्यापाºयांनाही असाच गंडा घालण्यात आला. सायबर सेलच्या माध्यमातून या प्रकरणाचा शोध घेतला जात आहे.विवाह इच्छुक भामट्यांच्या जाळ्यातविवाह जुळविणाºया संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करून अनुरूप जोडीदाराचा शोध घेणाºयांची भामट्यांशी भेट घडू लागली आहे. कधी महिलांकडून पुरुषांना तर कधी पुरुषांकडून महिलांना लाखोंचा गंडा घातला जात आहे. विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख झाली. त्यातूनच लग्नाचे आमिष दाखवून महिलेकडून ३ लाख ४० हजार रुपये उकळले. त्यानंतर तो मुंबईला निघून गेला. त्याने महिलेशी संपर्क तोडला. अशीच एक घटना सांगवीतील व्यक्तीच्या बाबतीत घडली. या व्यक्तीला महिलेने तब्बल १८ लाखांचा गंडा घातला.
कस्टम साहित्याचे आमिषकस्टममध्ये तुमचे साहित्य अडकले आहे. त्यासाठी काही रक्कम आॅनलाइन भरा, असे सांगून पिंपरीगाव येथील एका डॉक्टर महिलेची एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. क्रेडिट कार्डची माहिती लिक झाल्याचे सांगून व कार्डची गोपनीय माहिती विचारून एका तरुणाची एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार भोसरीत उघडकीस आला होता. कधी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून तर कधी गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कम मिळेल, असे भासवून विशिष्ट बँक खात्यात आॅनलाइन पैसे भरण्यास भाग पाडून नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घालण्याचे भामट्यांचे उद्योग सुरू आहेत.
जागरूक रहा, सावधानता बाळगाआॅनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटनांची झळ नोकरदार, अधिकारी अशा सुशिक्षित वर्गाला बसू लागली आहे. क्रेडिट, डेबिट कार्डचा उपयोग करताना दक्षता घ्यावी. अनोळखी व्यक्ती बँक खात्याचा तपशील मागत असेल तर प्रतिसाद देऊ नये. शंका वाटल्यास थेट संबंधित बँकेत जाऊन चौकशी करावी. फसवणूक टाळण्यासाठी जागरूकता दाखवा, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.