पुणे : महापालिकेचा आर्थिक कणा समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब बोडके, काँग्रेस पक्षाकडून अविनाश बागवे व भाजपाकडून राजेंद्र शिळिमकर यांनी मंगळवारी अर्ज भरले आहे. आघाडीचा धर्म पाळत आपल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या दोघांच्या खेचाखेचीमध्ये विजयाची संधी हिसकावून घेण्यासाठी भाजपाही सरसावला आहे.स्थायी समिती अध्यक्षपदासाठी येत्या ५ मार्चला निवडणूक होणार आहे. त्यासाठी मंगळवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्ज स्वीकारण्यात आले. स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ६, काँग्रेसचे ३, भाजपाचे ३, मनसेचे ३ व शिवसेनेचा १ सदस्य आहे. महापालिकेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आघाडी करून सत्ता मिळविली आहे. महापौर पद राष्ट्रवादीकडे, तर उपमहापौर पद काँग्रेसकडे देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सध्या परदेश दौऱ्यावर असून, येत्या दोन दिवसांत ते पुण्यात परतणार आहेत. त्यानंतर अध्यक्षपदाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. बाळासाहेब बोडके यांना राष्ट्रवादीकडून पहिल्यांदाच मोठ्या पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आपली उमेदवारी कायम राहावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. स्थायी समितीचे अध्यक्षपद ४ वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिले आहे, आता एक वर्षासाठी तरी काँग्रेसला समितीचे अध्यक्षपद मिळावे, यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या या खेचाखेचीचा अचूक लाभ उठविण्यासाठी भाजपाकडून डावपेच लढविले जात आहेत. सर्व ‘जर-तर’च्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत
By admin | Published: March 02, 2016 1:24 AM