पुणे : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाबाबत पुणे जिल्ह्यात २१ लाख ६० हजार घरांवर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ध्वजाची उपलब्धता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. माफक दरात ध्वज उपलब्ध करून देण्यात येणार असून, काही दानशूर संस्था, सहकारी साखर कारखाने, आदींचा त्यात सहभाग असणार आहे. आठवडे बाजारातही ध्वज विक्री केंद्रे लावण्यात येणार आहेत.
‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यात केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक किरण सोनी गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सचिन घाडगे उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्याचे नियोजन चांगले झाले असून, या उपक्रमांदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्यास येथील कला, संस्कृतीला अधिक उजाळा मिळेल, असे मत गुप्ता यांनी केले. तर पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नाट्यगृहे, सांस्कृतिक सभागृहे असून, या ठिकाणी तसेच नगरपरिषद पातळीवरही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे देशमुख म्हणाले.
यावेळी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. हा उपक्रम राबविण्यासाठी प्रत्येक तहसीलदार आणि गटविकास अधिकारी कार्यालय स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. ऐतिहासिक किल्ले, क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानींची स्मारके यांची दुरुस्ती, सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. सुमारे एक हजार हेक्टरवर बांबू लागवडीचे नियोजन आहे. स्वातंत्र्य रॅली, शाळा महाविद्यालयांमधून निबंध, वक्तृत्व, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे प्रसाद यांनी सांगितले.