पुणे : चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी संपूर्ण भारतात साजरी केली जाते. त्यावेळी पाळणे गात आणि प्रसाद वाटत रामजन्माचे स्वागत केले जाते. पण पुण्यातल्या तुळशीबाग राम मंदिरात मात्र रामाच्या पोशाखाच्या तुकडारुपी आशीर्वाद मिळवण्याची प्रथा आहे.
पुण्यातील तुळशीबाग या खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी १७६१साली राम मंदिराची स्थापना करण्यात आली.या मंदिरात राम जन्माआधी जवळच असलेल्या शंकर मंदिरापर्यंत छबिन्याची मिरवणूक काढण्यात येते. त्यावेळी रामाचा पोशाखही मिरवून आणण्यात येतो. रामजन्मोत्सवाचा सोहळा पार पडल्यानंतर रामाच्या वस्त्राचा भाग असलेला लाल रंगाचा तागा भक्तांमध्ये वाटला जातो. पण ही वाटण्याचीही विशिष्ट पद्धत आहे. शहरातील जुन्या तालमीचे पहिलवान ते वस्त्र अक्षरशः खेचून त्याचे तुकडे करतात आणि उंचीवरून खाली टाकले जातात. हे तुकडे झेलण्यासाठी खाली अगदी झुंबड उडालेली असते. हे वस्त्र खिशात किंवा देवघरात ठेवल्याने किंवा सोबत बाळगल्याने सर्व संकटे दूर होतात अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे.या मंदिराची व्यवस्था बघणाऱ्या तुळशीबागवाले कुटुंबाची ही ११वी पिढी आहे. राघवेंद्र तुळशीबागवाले यांनी याबाबत माहिती देताना भाविक सकाळपासून वस्त्राचा प्रसाद मिळवण्यासाठी गर्दी करत असल्याचे सांगितले. हे वस्त्र वाटण्याचा मान पहिलवानांना दिला जातो कारण रामाचा भक्त हनुमान हा प्रचंड ताकदवान होता. त्याचे प्रतीक म्हणून हा मान तालमीच्या पहिलवानांना दिला जातो असेही त्यांनी स्पष्ट केले.