Junnar Vidhan Sabha ( Marathi News ) : "शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही माझ्यासाठी एकच परिवार आहे. जुन्नर विधानसभासाठी चर्चा करून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. परंतु एका व्यक्तीमुळे ते शक्य झाले नाही," असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जुन्नरचे उमेदवार अतुल बेनके यांनी खासदार अमोल कोल्हे यांचे नाव न घेता टोला लगावला. पवार कुटुंब एकत्र राहो, ही माझी इच्छा शेवटपर्यंत राहील. मी पवार कुटुंबाचाच उमेदवार आहे, असंही बेनके यांनी म्हटलं आहे.
विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात अतुल बेनके यांनी पत्रकार परिषदेतून आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष भाऊ देवाडे, माजी सभापती विशाल तांबे, बाळासाहेब खिलारी, फिरोज पठाण, सुजित खैरे, विकास दरेकर, अरुण पारखे, महिला तालुकाध्यक्षा सुप्रिया लेंडे, उज्ज्वला शेवाळे, वैष्णवी चतुर, युवती तालुकाध्यक्षा अक्षदा मांडे, पुष्पा गोसावी, पोपटराव रावते, गणपत कवडे, गुलाबराव नेहेरकर, समद इनामदार, प्रकाश ताजणे, विनायक तांबे, पापा खोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
माजी आमदार शरद सोनवणे यांनी उमेदवारी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत बोलताना आमदार बेनके म्हणाले की, निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. स्टंटबाजी करून देखावा केल्याने प्रसिद्धी मिळेलही परंतु ती कायम टिकणार नाही, अशी टीका त्यांनी सोनवणे यांच्यावर केली. घटक पक्ष, महिला पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आपण २८ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत, असे बेनके यांनी जाहीर केले.
सभापती संजय काळे यांनी अतुल बेनके यांचा विजय निश्चित असल्याचे सांगत नारायणगावसाठी १५० कोटींची विकासकामे आणली. हिरडा प्रकल्पासाठी १४ कोटी रुपये मंजूर केले. पाच वर्षांत पाणी कमी पद दिले नाही. त्यामुळे सर्व जनता ही अतुल बेनके यांच्या पाठीशी आहे. महायुतीची अनेक मान्यवर, नेते मंडळी यांच्या उपस्थितीत २८ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, ३३ हजार मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.