पुणे : गणेश पेठ दूधभट्टीलगतच्या नागझरी नाल्यात एका पंधरा ते सोळा वर्षांच्या मुलासह दोघा पुरुषांचे मृतदेह शुक्रवारी सायंकाळी आढळल्याने शहरात खळबळ उडाली. तिघांच्याही डोक्यावर जड वस्तूने प्रहार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी तातडीने तपास पथक तयार केले आहे. रात्री उशिरापर्यंत मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय व दूधभट्टीच्या मध्ये असलेल्या नाल्यामध्ये तिघांचे मृतदेह आढळले. या तिघांचा खून एक किंवा दोन दिवस अगोदर झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे येथे दिवस रात्र सुरक्षारक्षक असतात. येथील नाल्याच्या भिंतीला रंग देण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक पेंटर नाल्याच्या खालील बाजूला रंगकाम करीत होता. तेथील रंगकाम संपल्यावर नाल्याच्या शेवटच्या टोकाला रंग देण्यासाठी तो जात असताना त्याला तेथे एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्याने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. यानंतर फरासखाना व समर्थ पोलीस ठाण्याचे कर्मचारी तेथे दाखल झाले. ते मृतदेहाची पाहणी करीत असतानाच त्यांना थोड्याच अंतरावर आणखी एका पुरुषाचा मृतदेह आढळला. नाल्यामध्ये आणखी एक मृतदेह आढळला. हा मृतदेह १३ वर्षांच्या मुलाचा होता. त्याची ओळख त्याच्या मामाने सांगितल्यानुसार नाबेद रफिक शेख असे त्याचे नाव आहे़ आणखी एक मृताची ओळख पटली असून त्याचे नाव संदीप असल्याचे पोलिसांनी सांगितले़ दोघेही नाडेगल्ली येथील राहणारे आहेत़अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे यांनी घटनास्थळी भेट दिली. विच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आले.
पुणे शहरात तिहेरी हत्याकांड, मृतांमध्ये एक तेरा वर्षांचा मुलगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 2:32 AM