पुणे: सेवानिवृत्त जवानांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सैनिक कल्याण मंडळाच्या निवृत्तिवेतन विभागाकडून सध्या २००६ पूर्वी निवृत्त झालेल्या जवानांच्या वेतनामध्ये झालेला गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील ५० हजार सेवानिवृत्त जवान व जवानांच्या पत्नी यांच्या निवृत्तिवेतनामध्ये गोंधळ झाला असल्याची माहिती समोर आली आहे.जवानांच्या निवृत्तिवेतनाबाबत २००९ मध्ये तत्कालीन संरक्षणमंत्री यांनी राज्यसभेत १९ लाख निवृत्तिवेतन धारक जवानांपैकी केवळ ३ लाख निवृत्तिधारकांना योग्य निवृत्तिवेतन मिळत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर या गोष्टीला खऱ्या अर्थाने वाचा फुटली होती. त्या वेळी बुलडाणा जिल्ह्यातील निवृत्त कर्नल सुहास जतकर यांनी तत्काळ स्थानिक स्तरावरून चौकशी सुरू केली. सेवानिवृत्त जवान व जवानांच्या विधवा पत्नी यांना योग्य निवृत्तिवेतन दिले जावे यासाठी सैनिक कल्याण मंडळाने २०१३मध्ये निवृत्तिवेतन विभागाची स्थापना करण्यात आली. हा विभाग देशातील एकमेव निवृत्तिवेतन विभाग असून सुहास जतकर हे मंडळाचे संचालक आहेत.सुहास जतकर म्हणाले, की आम्ही शहीद जवानांच्या विधवा पत्नींना मिळणाऱ्या निवृत्तिवेतनाची चौकशी केली केली. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील १३ जवानांच्या पत्नींना योग्य निवृत्तिवेतन दिले जात नसल्याचे दिसून आले. दुसऱ्या जिल्ह्यामध्येसुद्धा निवृत्तिवेतनामध्ये गोंधळ असल्याचे आढळून आले. त्यानंतर आम्ही काही दुर्गम भागातील गावांमध्ये राहणाऱ्या सेवानिवृत्त जवानांशी संपर्क साधला असता, त्यांच्या निवृत्तिवेतनामध्येही असलेली विसंगती दूर केली.निवृत्तिवेतन विभागाचे ग्रुप कॅप्टन सुहास पाठक (निवृत्त) म्हणाले, की आम्ही निवृत्तिवेतनासाठी काही नियमावली निश्चित केली आहे. निवृत्तिवेतन समन्वयक योग्य पद्धतीने अर्ज भरला आहे की नाही याची तपासणी करतो. त्यानंतर पुण्यातील सैनिक कल्याण मंडळाकडे पाठवून पुढील कार्यवाही करतो.
सेवानिवृत्त जवानांच्या निवृत्तिवेतनात गोंधळ
By admin | Published: May 11, 2015 6:21 AM