पुणे : तुटलेल्या संसाराचे दु:ख सहन केले; पण दिवाळीच्या चाहुलीने दुरावलेल्या दिव्यांच्या आठवांनी ते आणखी गहिरे झाले आहे. त्यामुळे तब्बल ६० पालकांनी काही दिवसांपुरता मुलांचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केले आहेत. यामध्ये बहुतांश वडील आहेत.ज्या दांपत्यांचा घटस्फोट झाला आहे किंवा नांदण्यावरून भांडणे होत आहे, त्यांच्या मुलांचा ताबा आई किंवा वडिलांकडे देण्यात येतो. ज्यांच्याकडे मुलांचा ताबा आहे ते पालक आयुष्यातील सुख-दु:खाचे क्षण मुलांबरोबर घालवत असतो. मुले लहान असतील तर शक्यतो त्यांचा ताबा आईकडे देण्यात येतो. अशा परिस्थितीत मुलांच्या वडिलांना त्यांचा ताबा पाहिजे असेल तर त्यांना हिंदू विवाह कायद्यानुसार न्यायालयात अर्ज करण्याची मुभा आहे.आईदेखील अशा प्रकारचा अर्ज करू शकते. या कायद्यांतर्गत दिवाळीच्या सुटीसाठी काही दिवस मुलांचा ताबा मिळावा, यासाठी तब्बल ६० आई-वडिलांनी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला आहे. मुलांना किती दिवस सुटी आहे, त्यांची आई किंवा वडिलांकडे जाण्याची इच्छा आहे का?, ज्याला ताबा देण्यात येणार आहे ती व्यक्ती त्यांचा सांभाळ करू शकते का? मुलांसाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे का? ताबा दिल्यानंतर मुलांच्या जिवाला काही धोका तर नाही ना? या बाबींचा विचार करून न्यायालयात ठराविक काळासाठी ताबा देण्याचा निर्णय देत असते. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या पूर्वी पालक न्यायालयात अर्ज करतात, अशी माहिती न्यायालय प्रशासनाकडून देण्यात आली.आईवडिलांचा घटस्फोटाचा खटला सुरू असेल किंवा घटस्फोट झाला असेल तर मुले एका पालकाकडे राहत असतात. अशा परिस्थितीत त्यांना आई-वडिलांचा एकत्र सहवास लाभणे कठीण असते. कधी-कधी तर मुलांचीदेखील इच्छा असते की, त्यांनी आपल्या आईला किंवा वडिलांना भेटावे. मात्र, आई वडिलांच्या वादामुळे त्यांना कोणातरी एकाकडेच थांबावे लागते. अशा पालक व मुलांची भेट व्हावी, म्हणून कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. ताबा मिळाल्यानंतर मुले २४ तास आई किंवा वडिलांच्या सहवासात असतात.ताब्यात असताना मुलांना काही होणार नाही, याची मात्र त्यांना काळजी घ्यावी लागते. ताब्यात असताना त्यांना काही झाले तर दिलेली मुदत त्वरित रद्द करण्यात येते. काही प्रकरणांमध्ये तर आई किंवा वडिलांना त्यानंतर कधीच ताबा देण्यात आलेला नाही, अशी माहिती अॅड. माधवी परदेशी यांनी दिली.समेट घडविण्याचा प्रयत्न...घटस्फोटाचा दावा दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये देखील मुलांचा ताबा मागितला जातो. अशा वेळी आई किंवा वडिलांना मुले राहत असलेल्या घरात जाऊन त्यांना भेटण्याचे आदेश देण्यात येतात. काही प्रकरणांत ते बगिच्यात देखील भेटू शकतात. मात्र सध्या जी व्यक्ती त्यांना सांभाळत आहे त्याने तेथे उपस्थित राहणे ही गरजेची अट आदेशात ठेवण्यात येते. त्यामुळे मुलांच्या निमित्ताने आई-वडीलदेखील भेटतात. अशा वेळी मुलांच्या भविष्याचा विचार करीत त्यांच्यातील वाद मिटण्याची शक्यता आहे, असे अॅड. ज्योती जाधव यांनी सांगितले.
तुटलेल्या संसारामुळे दुरावलेल्या चिमुरड्यांसाठी तडफड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 3:52 AM