- लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून कोथरूड येथील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित तरुणीच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे तरुणाजवळ आढळलेल्या ‘सुसाईड नोट’मध्ये नमूद आहे. तिच्या मित्राने ठार करण्याची धमकी दिल्याचेही म्हटले आहे. २७ एप्रिल रोजी झालेल्या या घटनेबाबत कोथरूड पोलीस माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे गुरुवारी दिसून आले.प्र्रतीक मुरलीधर कचरे (वय २२, रा. गुजरात कॉलनी, कोथरूड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील मुरलीधर कचरे (वय ५३) यांनी फिर्याद केली असून, याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीसह तिचा मित्र मनीष बाबा धुमाळ (वारजे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक आणि संशयित तरुणी कोथरूड परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेतात. प्रतीकचे मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तिने त्याला लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, त्यानंतर ती लग्नाला नकार देत होती. तरीही तरुण तिच्यावर प्रेम करत होता. त्यामुळे तरुणीने त्याला पोलिसांकडे जाऊन तक्रार देणार असल्याची धमकी दिली. प्रतीक याच्याकडून तरुणीने तीन हजार रुपयेदेखील घेतले. तिने ते परत केले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. माहिती देण्यास टाळाटाळ प्रतीक याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पोलिसांकडून प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र त्यानंतर कागदपत्रांच्या चौकशीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सुमारे ४९ दिवसांनी गुन्हा दाखल झाला. मात्र त्याची सविस्तर माहिती सांगण्यास टाळाटाळ केली जात होती. अनेकदा संपर्क करूनही तपासी अंमलदारांचा मोबाईल स्विच आॅफ होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती नसल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात येत होते. त्यामुळे या प्रकरणाबाबत शंका उपस्थित होत आहेत.
प्रेयसीचा त्रास; युवकाची आत्महत्या
By admin | Published: June 16, 2017 4:54 AM