ओतूर : गावच्या हद्दीत नगर-कल्याण महामार्गावर ट्रकच्या धडकेने एक जखमी झाला तर, पुढे काही अंतरावर ट्रक रस्त्याच्या बाजूच्या गाळ्यामध्ये घुसल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हा अपघात गुरुवारी रात्री १०.३० च्या दरम्यान ओतूरच्या मोनिका चौक ते नवीन बसस्थानकादरम्यान झाला.याबाबत पोलीस सूत्रांकडुन मिळालेली माहिती अशी : गुरुवारी झालेल्या या अपघाताबाबत ट्रक चालक अशोक परमेश्वर भाभड (रा. अगस्थान, ता. पाथर्डी, जि. अ.नगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हकिगत अशी की, रात्री कल्याणकडून पाथर्डीकडे चाललेला ट्रक एमएच २० सीटी १९१९ याने हायवेवर ओतूर गावच्या हद्दीत मोनिका चौकात गणेश भास्कर कदम यांना ठोकर देऊन जखमी केले. ट्रकचालकाने ट्रक तशीच पुढे नेऊन बसस्थानकाच्या थोडे मागे कच्चा रस्ता पाहून ट्रक हायवेच्या खाली घेतली. मात्र, ट्रक येथील दोन गाळ्यात घुसला, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रकचालक येथून निघून त्याच्या घरी पाथर्डीला गेला. ट्रक गाळ्यात घुसल्यामुळे येथील गाळ्यातील संतोष तांबे यांच्या विघ्नहर पशुखाद्य ट्रेडिंग कं. या दुकानातील लाखो रुपयांच्या पशुखाद्याचे व इतर साहित्याचे नुकसान झाले आहे, तर यांच्या शेजारीच असलेल्या अभिजित बयस यांच्या अनुष्का अॅटो कन्सल्टंट या दुकानात असलेल्या सहा दुचाकी या ट्रकखाली चिरडल्याने दुचाकीचेही नुकसान झाले आहे. महेश कदम यांनी ओतूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
नगर-कल्याण महामार्गावर ट्रकचा अपघात
By admin | Published: April 10, 2017 1:43 AM