नसरापूर (पुणे) :पुणे-सातारा महामार्गावर निगडे (ता.भोर) येथे मुंबई ते चेन्नई जाणाऱ्या माल ट्रकने अचानक पेट घेतल्याने महामार्गावर मोठया प्रमाणात धुराचे लोट तयार होऊन गाडीतील सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. ट्रक चालकाच्या प्रसंग अवधान राखून महामार्गापासून थोडे दूर नेल्याने मोठा अनर्थ टळला. त्यामूळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याप्रकरणी सुभाष देवकीनंद शर्मा ( वय ३९ वर्षे) (रा.कलबोली) यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. दुपार नंतर जुने इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन ट्रक ( एम एच ४३,बी जी ०१६२ ) निगडे येथील सर्व्हिस रोड लगत बनाजी धाब्या जवळ पुणे सातारा मार्गाने जात असताना या ट्रकच्या मागून पुढे जाणाऱ्या वाहन चालकांनी ट्रकने मागून पेट घेतला असल्याचे या दुर्घटना ग्रस्त ट्रक चालकाला सांगितले. त्यामुळे प्रसंग ओळखून या ट्रक चालकाने महामार्गापासून रस्त्यालगत काही अंतरावर नेत चालक व क्लिनरने गाडीतून बाहेर पडले त्यामुळे जीवितहानी झाली नाही.
राजगड पोलिसांकडून भोर अग्निशामक दलाला घटनेची माहीती मिळताच त्यांनी त्वरित दाखल होऊन आगीत जळणाऱ्या ट्रक वर पाण्याचे फव्वारे मारायला सुरवात केली. परंतु अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण आणण्यास उशीरा यश मिळाले. आगीच्या घटनेत ट्रक जळून खाक झाला, मात्र सुदैवाने त्यात कुठल्याच प्रकारची जिवीतहानी झाली नाही.