वानवडी : परिसरात पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी पहाटेच्या वेळी पुणे - सोलापूर रस्त्यावरून मुंबईला निघालेली गोवंश मांसानी भरलेली गाडी फातिमानगर चौकात पकडण्यात गोरक्षण समाजकार्य करणाऱ्यांना यश आले आहे. या वेळी गाडीचालक सचिन भीमराव काळे (वय २९, ता. सोलापूर) यास पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सरसेनापती हंबीरराव मोहिते, गोरक्षदल गोसेवाचे सभासद व गोरक्षणाचे समाजकार्य करणारे दीपक बाजीराव गोरगल (रा. झेंडेवाडी) यांना माहिती मिळाली होती की गायी कापून मांस भरलेली गाडी इंदापूर नेहरू चौक कसाई मोहल्यामधून पुणे-सोलापूर मार्गे मुंबईला जाणार आहे. त्या अनुषंगाने दीपक गोरगल यांनी त्यांचे सहकारी मित्र सूरज सोमनाथ भगत व सचिन साहेबराव शिंदे यांना कळवल्यानंतर तिघे हडपसरमध्ये आले व गाडीची वाट पाहत बसलेले असताना पहाटे ४.३० वाजता त्यांना बोलेरो पिकअप टेम्पो गाडीतून (एमएच १२ पीक्यू २४८४) उसाचे वाढे भरलेले व पाणी गळत असल्याने गाडीत गोवंश मांस असल्याचा संशय आला. त्यांनी तत्काळ १०० नं.वर फोन करुन पोलिसांची मदत मिळावी म्हणून फोन केला. त्यानंतर गाडीचा पाठलाग करत ती गाडी पुणे सोलापूर रस्ता, फातिमानगर चौक येथे अडवली व पाहणी केली असता उसाच्या वाढ्याखाली ताडपत्रीच्या खाली बर्फात जनावरांचे मुंडके, मांस दिसले. पोलिसांच्या मदतीने गाडी भैरोबानाला चौकीकडे आणून चालकाला अटक केली. पकडलेल्या मांसाची शहानिशा करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांना पोलिसांनी बोलवल्यानंतर मांसाची पाहणी केली व ते गोवंश सदृश्य मांस प्रथमदर्शनी दिसत असल्याचे सांगितले. हे मांस जवळपास ६०० ते ७०० किलो असण्याची शक्यता असून त्याची किंमत रु १,१०,००० पर्यंत असेल असा अंदाज आहे.मागील ५ वर्षांपासून गोहत्येच्या विरोधात काम करत असून, अशा प्रकारे गोहत्या करून मांस विकणाºयांना पकडले असून, त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. - दीपक गोरगल, गोरक्षदल गोसेवा सभासद