पुणे, दि. 7 - खंडाळ्याजवळ मालगाडीचे डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. मालगाडीचे डबे रुळावरून खाली उतरल्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. खंडाळा येथे गेट क्रमांक 19 जवळची घटना घडली आहे. कोल्हापूर, पुणे, सोलापूरच्या दिशेनं जाणा-या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस रद्द केली आहे. सीएसएमटी- डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, पुणे-इंद्रायणी एक्स्प्रेस, सीएसएमटी-लातूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर सह्याद्री, महालक्ष्मी एक्स्प्रेसचा खोळंबा झाला आहे. मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूकही उशिरानं सुरू आहे.मुंबई-पुणे लोहमार्गावर खंडाळा घाट चढून आल्यानंतर खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ अचानक मालगाडीचे डबे घसरल्याने पुणे व मुंबई दोन्ही बाजूकडील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पुण्याजवळ खंडाळा येथे मालगाडी घसरल्याने मिरज-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मिरजेकडून मुंबईला जाणाऱ्या चालुक्य एक्सप्रेस व हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस या दोन्ही एक्स्प्रेस, महालक्ष्मी व सह्याद्री एक्सप्रेस या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. मुंबईतून कोल्हापूरला येणाऱ्या महालक्ष्मी व सह्याद्री एक्सप्रेसही रद्द झाल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार डाऊन मिडल लाईनने पुण्याकडे येणारी मालगाडी खंडाळ्यातील किमी 123 व 124 दरम्यान आली असता मालगाडीचे दोन डबे रुळावरुन घसरल्याने अप व डाऊन दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. या घटनेमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या विविध रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. रेल्वेचे अधिकारी व कामगार घटनास्थळी पोहोचले असून, डबे बाजूला घेण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे समजले. मदतीसाठी पुणे स्टेशनवरही तुम्ही संपर्क साधू शकता, 02026105899, 02026059002 या नंबरवर फोन करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.
खंडाळा घाटमार्गावर रेल्वेची मालगाडी घसरल्यामुळे मुंबई-पुणे मार्गावरची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे रेल्वेकडून दुपारनंतर सुटणा-या अनेक मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे, कोल्हापूरकडे जाणा-या रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने छ.शिवाजी महाराज स्टेशन, दादर, कल्याण व कर्जत येथून जादा बसेस सोडल्या आहेत.