सांगवी (बारामती) : शिर्डी वरून बेळगावला बटाटयाने भरून निघालेला ट्रक रात्रीच्या वेळी वळणावर अंदाज न आल्याने फलटण रस्त्यावरील ओढ्यात थेट जाऊन पलटी झाला आहे. यामध्ये ४ ते ५ टन बटाट्याचा भुगा होऊन मोठे नुकसान झाले आहे. तर यामध्ये चालक सुरक्षित असून किनर किरकोळ जखमी झाला आहे. परिसरातील नागरिकांनी किंनरला रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचारकामी मदत केली.
दहा टन बटाटयाने भरलेला ट्रक शिर्डीवरून फलटण मार्गे बेळगावला निघाला होता, बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान पाहुणेवाडी येथील ओढ्यावरील वळणावर अंधारात खड्डे न दिसल्याने हा अपघात होऊन ट्रक थेट ओढ्यात जाऊन पलटी झाला.घटना स्थळी जाऊन पोलिसांनी पाहणी केली आहे. याच ठिकाणी अपघात होऊ लागल्याने बारामती प्रशासानाच्या ढिसाळ काराभारामुळे प्रवाशांच्या जीवावर बेतू लागले आहे. अपघात होऊन देखील रस्त्याच्या बाबतीत प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याचे चित्र आहे.
मागील दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने बस याच ओढ्यात पलटी झाली होती. तर मागील आठवड्यात देखील एक कार ओढ्यात जाऊन पडली होती. यामुळे अपघात होऊन ओढ्यात पडण्याच्या घटना वारंवार होऊ लागल्या आहेत. याच वळणार प्रकाश दिव्याची सोय नसल्याने रात्रीच्या अंधारात नवीन व लांब पल्ल्यावरून येणारी छोटी-मोठी वाहने थेट ओढ्यात जाऊ लागली आहेत. मात्र, बारामतीचे प्रशासन जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.