वारजे : मुंबई बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर वारजे येथील अतुलनगरसमोर ट्रक उलटल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पहाटे तीन वाजता अपघात होऊनही उलटलेला ट्रक हटवाायला सकाळी साडेनऊ वाजल्याने या ठिकाणच्या कोंडीत दोन्ही बाजूंना भर पडत होती.
याबाबत पोलीस व प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या महितीनुसार, सुरतेहून पार्सल घेऊन ट्रक (केए २२-ए ८६९७) बंगळुरूच्या दिशेने निघाला होता. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास डुक्करखिंडीच्या पुढे रुणवाल पूल ओलांडताच उतारावर चालाकाचे नियंत्रण सुटले. या ठिकाणी माई मंगेशकर रुग्णालयाजवळ नवीन पुलाचे काम चालू आहे. अंधारात त्याच्या कठड्याचा अंदाज न आल्याने गाडी त्याच्यावरूनच घसरून उलटल्याचा अंदाज येथील वाहतूक कर्मचारी व पोलिसांनी व्यक्त केला. सुदैवाने यात चालकाला कोणतीच इजा झाली नाही. यानंतर येथे दाखल झालेल्या वाहतूक कर्मचारी व महामार्ग वॉर्डननी येथील वाहतूक बॅरिकेडिंग करून वळविण्याचा प्रयत्न केला. पण, सकाळी सातनंतर मात्र या ठिकाणी चांदणी चौक व वडगाव दोन्ही बाजूंना कोंडी वाढत गेली. भरलेला अवजड ट्रक क्रेनने उचलणे अवघड जात असल्याने त्यातील पार्सल बाहेर काढून ट्रक मोकळा करण्यात आला व सकाळी साडेनऊच्या सुमारास तो बाजूला काढण्यात आला. यांनतर संपूर्ण वारजे परिसर, महामार्ग व सेवा रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी पाहायला मिळाली. ११ वाजले तरी परिसरातील वाहतूक सुरळीत झाली नव्हती.सदर उलटलेला ट्रक काढल्यावरही त्याचे डिझेल व आॅइल महामार्गावर सांडले होते. वाहतूककोंडीमुळे अग्निशामक दलाची गाडी अपघातग्रस्त ठिकाणी पोहोचायला उशीर झाला. रस्त्यावरील आॅइल धुऊन काढल्यानंतर ही मार्गिका (लेन) चालू केली.- अजय चांदखेडे, पोलीस निरीक्षक, वाहतूक वारजे विभाग