गोरक्षनाथ किसन विधाटे यांच्या घराशेजारी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची ऊसतोड सुरू होती. २७ फेब्रुवारी या दिवशी ऊस भरून ट्रक (क्रमांक एम.एच.१४ बी.जे.७४७४) हा शेतातून बाहेर जात असताना, विधाटे यांच्या शेडजवळ येताच गाडीचे चाक एका बाजूला खचल्याने ट्रक त्यांच्या शेडवर पलटी झाला. त्यामुळे गोरक्षनाथ विधाटे यांचे मोठे नुकसान झाले होते. याबाबत त्यांनी ट्रक मालक किशोर पंढरीनाथ वायकर यांच्याशी संपर्क करत, नुकसानीची भरपाई मागितली असता, ट्रक मालक याने तुम्ही पोलिसात तक्रार करू नका, मी नुकसानीची भरपाई देतो, असे म्हणाले. त्यावेळी विधाटे यांनी नुकसानभरपाई मिळणार, म्हणून तक्रार केली नाही. मात्र, काही दिवसांनंतर ट्रक मालक याने भरपाई देण्यास टाळाटाळ करत, नुकसानग्रस्त शेतकरी गोरक्षनाथ किसन विधाटे यांच्याविरोधात ट्रक आणायला गेल्यानंतर शिवीगाळ केल्याची तक्रार मंचर पोलीस ठाण्यात केली आहे, तर विधाटे यांनी ट्रक चालक गणेश दिगंबर राठोड (रा.जुन्नर) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात फिर्याद दाखल झाली असून, पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला आहे. अधिक तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, शेतकरी गोरक्षनाथ विधाटे यांनी पोलीस प्रशासन यांनी योग्य तो तपास करून आम्हाला नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी भावना व्यक्त केली आहे.