वेल्हे: वेल्हे ते चेलाडी रस्त्यावर मार्गासनी येथे साईड पट्ट्या न भरल्यामुळे दुसऱ्या वाहनात साईड घेत असताना ट्रक पलटी झाला. चालकाने प्रसंगावधान दाखवून उडी मारली त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाहीं.
पुणे येथील सिटी पोस्ट चौकात भर रस्त्यात ट्रक खड्ड्यात गेल्याची घटना ताजी असतानाच वेल्हे ते चेलाडी रस्त्यावर मार्गासणी येथे पावसाळ्यापूर्वी साईड पट्ट्या भरणे आवश्यक होते. या साईड पट्ट्या न भरल्यामुळे एक महाल वाहतूक करणारा ट्रक या ठिकाणी येत असताना समोरून आलेल्या वाहनास साईट देत होता. रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईड पट्टीवर ट्रक गेल्यावर रस्ताच खचल्यामुळे हा ट्रक जागेवरच शेजारील असलेल्या शेतात पलटी झाला. चालकाने प्रसंगवधान दाखवून उडी मारली व आपले प्राण वाचवले. या रोडला जास्तीची वळणे आहेत. वळणावर झाडे झुडपे वेली वाढल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यातील नागरिक अगोदरच या रस्त्यावरील पडलेले मोठे मोठे खड्ड्याने बेजार झाले असून अनेकांना अपघात होऊन खड्ड्यांमुळे दुखापत झाली आहे. राजगड, तोरणा, मढेघाट, व विविध ऐतिहासिक स्थळे असल्याने तालुक्यामध्ये पर्यटनासाठी पर्यटकांची नेहमीच वर्दळ या रस्त्यावर असते. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हाच प्रश्न पर्यटकांचं तालुक्यातील नागरिकांना पडलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या गोष्टीकडे मात्र डोळे झाक करत आहे. एखादा मोठा अपघात होऊन एखाद्याचे प्राण गेल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येईल का? असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहे.